महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यावर बदलीची मागणी

0
333

अमोल थोरात यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) : पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह हे घोटाळेबाज असून, त्यांनी खाबुगिरी आणि बाबुगिरीला प्राधान्य दिले आहे. त्याला आळा घालण्यासाठी सिंह यांची त्वरित बदली करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे पदाधिकारी अमोल थोरात यांनी केली आहे. त्यामुळे आयुक्त सिंह यांच्यावर बदलीच्या ‘संक्रांती’ची चर्चा शहरात रंगली आहे.

अमोल थोरात यांनी याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. त्यात नमूद केले आहे की, महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सातत्याने चुकीची कामे करून शहरवासीयांचा रोष ओढवून घेतला आहे. १५०० कोटींचा टीडीआर घोटाळा तसेच विविध प्रकल्पांच्या निविदा प्रक्रिया देखील संशयास्पद आहेत. मुळात शेखर सिंह हे सातारा येथे कार्यरत असताना तेथे देखील त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप झाले होते. त्यामुळे त्यांची मुदतपूर्व बदली करून पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदी त्यांची नेमणूक करण्यात आली. आयुक्त म्हणून पदभार स्वीकारण्याबाबत ते उदासीन होते. सुरुवातीचे काही दिवस त्यांनी रजा घेऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही काही उपयोग होत नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी दिवस ढकलण्यासाठी महापालिका आयुक्त म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यातही ‘खाबुगिरी’वाल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून त्यांनी कामकाज सुरू केले.

शहराच्या विकासासाठी दूरदृष्टीचे प्रकल्प न आणता केवळ चालढकल म्हणून दिखावा केला. त्यातही या प्रकल्पांच्या निविदा प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात आहेत. त्यामुळे त्यावर सत्ताधारी नगरसेवक व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी आक्षेप घेतला. असे असतानाही आयुक्त शेखर सिंह यांनी न जुमानता प्रशासकीय हेकेखोरपणा कायम ठेवला. या हेकेखोरपणामुळे लोकोपयोगी प्रकल्प भाजपची महापालिकेत सत्ता असतानाही प्रत्यक्षात आणण्यात अडचणी आल्या. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची कार्यशैली त्यास कारणीभूत आहे.

शेखर सिंह यांच्या एकांगीपणामुळे राज्यातील महायुतीचे सरकार तसेच भाजपची प्रतिमा मलीन होत आहे. त्यांच्या नकारात्मकतेमुळे शहरातील सर्वसामान्यांमध्ये सरकार आणि भाजपाबाबत ‘कटू’ भावना निर्माण होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची ‘संक्रांत’ अपेक्षित आहे. प्रशासन हे जनसेवेला प्राधान्य देणारे असावे. मात्र, शेखर सिंह यांनी केवळ ‘खाबुगिरी’ला प्राधान्य दिले आहे. अशा ‘खाबुगिरी’ आणि ‘बाबुगिरी’ला आळा बसला पाहिजे. त्यासाठी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची त्वरित बदली करण्यात यावी, अशी मागणी अमोल थोरात यांनी निवेदनातून केली आहे.