महात्मा फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांचे प्रतिपादन*

0
169

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – विद्येविना मती गेली, मतीविना निती गेली, नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले, इतके अनर्थ अविद्येने केले, अशा शब्दात क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांनी समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. तसेच स्त्रियांना शिक्षण मिळावे अन्‌ तत्कालिन समाजातील निरक्षरता व गुलामगिरीचं उच्चाटन व्हावे, यासाठी क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडेंच्या वाड्यात मुलींच्या पहिल्या शाळेची मुहूर्तमेढ रोवली. अज्ञानाच्या अंधारात बंदिस्त स्त्रियांची मुक्तता करण्यासाठी फुले यांनी स्त्री शिक्षणाचे नवे पर्व सुरू केल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी मंगळवार (दि.11) केले. तसेच आजच्या तरूण पिढीने फुले दाम्पत्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी, असेही ते म्हणाले.

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंत्तीनिमित्त पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकातील क्रांतिसूर्य फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यास तसेच खराळवाडी येथील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयातील फुले यांच्या प्रतिमेस शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी गव्हाणे बोलत होते. याप्रसंगी महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष संजय औसरमल, माजी नगरसेवक माजी नगरसेवक सतीश दरेकर, प्रकाश सोमवंशी, ऍड.गोरक्ष लोखंडे, ओबीसी सेलचे अध्यक्ष विजय लोखंडे, जगन्नाथ साबळे, राजेंद्र वालिया, देवेंद्र तायडे, राजन नायर, व्यवस्थापन सेल अध्यक्ष अकबर मुल्ला, पदवीधर सेल अध्यक्ष माधव पाटील, ग्रंथालय सेल अध्यक्ष संग्राम चव्हाण, सुदाम शिंदे, अजय शिंदे, बाळासाहेब पिल्लेवार, मीरा कदम, युवराज पवार, रविंद्र सोनवणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अजित गव्हाणे पुढे म्हणाले, सामाजिक व आर्थिक विषमतेवर आधारित समाजव्यवस्थेला झुकारून समतेवर आधारित नवसमाजाची निर्मिती करण्यासाठी क्रांतिसूर्य महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. गरीब, निर्धन मुलींचे विवाह कमी खर्चात संपन्न व्हावेत, यासाठी फुलेंनी सत्यशोधक विवाहाची प्रथा सुरू केली. त्यामुळे हुंडा घेऊन लग्न करण्याच्या अमानवीय पद्धतीवर गदा आली. विधवा मुलींच्या केशवपन पद्धतीविरुद्ध लढा पुकारून त्यांनी ती पद्धती बंद करण्यास भाग पाडले. महात्मा फुले यांना शेतकरी वर्गाविषयी मोठी कणव होती. शेतकऱ्यांचा आर्थिक विकास अन्‌ त्यांच्या पाल्यांना सक्तीचे शिक्षण हा ज्योतिबांच्या समाज प्रबोधनाचा एक प्रमुख भाग होता. मात्र, आताच्या राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांचे काही घेणे-देणे नाही. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. सरकार सत्तेच्या धुंद्दीत मश्गू ल आहे. त्यामुळे राज्य सरकारने अडचणीत सापडलेल्या बळीराजाला तत्काळ मदत करावी, अशी मागणीही यावेळी गव्हाणे यांनी केली.

यावेळी बोलताना व्याख्याने सोमनाथ गोडसे म्हणाले, आज देशामध्ये प्रतिकुल परिस्थिती आहे. भारताचे संविधान आणि महात्मा फुले यांची समताच देशाला पुढे घेऊन जाऊ शकते.
तर यावेळी बोलताना ॲड. गोरक्ष लोखंडे म्हणाले, महात्मा फुले यांना बाबासाहेबांनी गुरु मानले होते. त्यांच्या लेखणीमध्येही बाबासाहेबांनी महात्मा फुले यांचे महत्त्व अधोरेखीत केलेले आहे. महात्मा फुले यांच्यामुळेच मला समाप्रबोधनाची प्रेरणा मिळाली. तर महात्मा फुले यांच्याच समग्र साहित्यातून प्रबोधनाची प्रेरणा मला मिळाली. जगातील भिडे वाड्यातील पहिली शाळा आणि जगातील पहिली महिला शिक्षकाही आम्हाला मिळाली. त्यामुळेच आमच्या हाती पाटी पेन्शील आली आहे. त्यामुळे महात्मा फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आजच्या तरुण पिढीने वाटचाल करायला हवी, असेही लोखंडे यावेळी म्हणाले.