महात्मा गांधी स्मारकाच्या कामाला मिळेना मुहूर्त भूमीपूजनाच्या एक वर्षानंतरही कामाला सुरुवात नाही

0
259

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – आदित्य बिर्ला ग्रुपने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतल्यानंतर पिंपरी – चिंचवड महापालिकेने हे स्मारक उभारण्यासाठी त्यांना जागा उपलब्ध करून दिली. महापालिका पदाधिकारी आणि बिर्ला ग्रुपकडून स्मारकाच्या कामाचे भूमिपूजनही झाले. मात्र, जागा देऊन तीन वर्षे आणि भूमीपूजन होऊन एक वर्षे उलटून गेले तरी या स्मारकाच्या कामाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. या जागेवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम झालेले नाही.

पिंपरी – चिंचवड शहरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे एकही स्मारक किंवा पुतळा नाही. मात्र, २०१७ – १८च्या अर्थसंकल्पातील तरतुदीपासून महात्मा गांधी यांचा पुतळा उभारण्याचा विचार सुरू झाला. आदित्य बिर्ला ग्रुपकडून गांधी स्मारक उभारण्यासाठी महापालिकेकडे जागा मागण्यात आली. त्यांनी स्मारकाचे संपूर्ण बांधकाम खर्च, देखभाल आणि दुरूस्ती करण्याची तयारी दर्शविली. त्या प्रमाणे १९ जून २०१९ रोजी स्थायी समितीच्या बैठकीत बिर्ला ग्रुपला स्मारक उभारणीसाठी चिंचवड येथील सिटी सव्र्हे क्रमांक ४६९४ मधील आरक्षण क्रमांक १२४ येथील आरक्षित ६ हजार ८०६.५८ चौरस मीटर जागा देण्यास मान्यता देण्यात आली. त्यानंतर आदित्य बिर्ला ग्रुपकडून १९ फेब्रुवारी २०२१ रोजी तत्कालीन महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

मात्र, भूमिपूजन झाल्यानंतर महात्मा गांधी स्मारकाचे पुढे काय ? असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे. भूमिपूजन झाल्यापासून नंतर स्मारकाचे कसलेही काम सुरू झालेले नाही. या संदर्भात महापालिका प्रशासनाकडून बिर्ला ग्रुपकडे पत्रव्यवहार करण्यात आला. स्मारक उभारणीसाठी विविध आवश्यक परवाने, तसेच एनओसी घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे बिर्ला ग्रुपने कळविले आहे, असे महापिालका अधिकाऱ्यांनी सांगितले. महापालिकेने जागा देऊन तीन वर्षे, तर भूमिपजून होऊन एक वर्ष उलटले. तरीही स्मारकाचे काम जैसे थे असल्यामुळे गांधीप्रेमींकडून स्मारकाचे काम तातडीने सुरू व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जागतिक दर्जाचे स्मारक उभारणार
महात्मा गांधी यांच्या स्मारकासाठी महापालिकेने जागा उपलब्ध करून दिली. तर, बिर्ला ग्रुपने दिल्ली, न्यूयॉर्क येथील गांधी स्मारकाच्या धर्तीवर जागतिक दर्जाचे स्मारक तयार करण्याची ग्वाही दिलेली आहे. या स्मारकात महात्मा गांधी यांचा संदेश जगभर पोहचवण्यासाठी आवश्यक दृकश्राव्य दालने, ग्रंथालय, सभागृह, संशोधन केंद्र, गांधी विचार परिक्षा केंद्र आणि गांधी जीवन दर्शन आदी गोष्टी असणार आहे. तसेच महात्मा गांधी यांची सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह ही मुल्ये आणि त्यांची माहिती देणारे विविध उपक्रम या स्मारकामध्ये समाविष्ट असणार आहेत.

” राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा पिंपरी – चिंचवडमध्ये उभारावा, यासाठी गेली १२ वर्षे आम्ही प्रयत्न करीत आहोत. आतापर्यंत वेळोवेळी तत्कालीन महापौर आणि आयुक्त यांना पत्रव्यवहार केला. आदित्य बिर्ला ग्रुपने गांधी स्मारक उभारण्याचा घेतलेला निर्णय अभिमानास्पद आहे. मात्र, महापालिकेने त्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्यानंतर या स्मारकाचे प्रत्यक्ष काम सुरू होऊ शकलेले नाही. या विषयी गांधीप्रेमी आणि शहरवासीयांच्या मनामध्ये प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. तरी, महापालिका आणि आदित्य बिर्ला ग्रुपने गांधी स्मारक लवकरात लवकर उभारण्यासाठी प्रयत्न करावेत, असे महात्मा गांधी विचार प्रचारक मंडळाचे अध्यक्ष बी. आर. माडगूळकर यांनी सांगितले.