Maharashtra

महाआघाडीत लोकसभासाठी शिवसेनेला मोठा वाटा

By PCB Author

March 16, 2023

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – गेल्या महिन्याभरापासून सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी चालू आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तसेच, बऱ्याच महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या पालिका निवडणुकाही लवकरच लागण्याची शक्यता वर्तवली जात असून त्यावरूनही राजकीय दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आधीपासूनच तयारी सुरू केलेली असताना आता मविआच्या जागावाटपाबाबत जोरदार चर्चा रंगू लागली आहे. मविआ लोकसभा निवडणूक एकत्र लढवणार असून त्यांच्यात जागावाटपाचा फॉर्म्युलाही ठरल्याचं सांगितलं जात आहे.

आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मविआ एकत्र लढवणार की स्वतंत्र? यावर अद्याप अधिकृत घोषणा आघाडीकडून करण्यात आलेली नाही. मात्र, असं असताना त्यांच्यात लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब झाल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये सर्वाधिक जागा ठाकरे गटाच्या वाट्याला आल्याचं सांगितलं जात आहे. तसेच, सर्वात कमी जागा काँग्रेसला देण्यात आल्या आहेत.

काय असेल मविआचा जागावाटप फॉर्म्युला? सूत्रांच्या हवाल्याने एबीपी न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार महाविकास आघाडी आगामी लोकसभा निवडणुका एकत्र लढवणार आहे. यात तिन्ही पक्षांनी एकमताने जागावाटपाचं गणित ठरवलं आहे. त्यानुसार, एकूण ४८ जागांपैकी ठाकरे गटाला २१ जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला १९ जागा तर काँग्रेसला ८ जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वंचित बहुजन आघाडीला काय? दरम्यान, या वृत्तानुसार सर्व ४८ जागा तिन्ही पक्षांनी वाटून घेतल्यामुळे त्याव्यतिरिक्त इतर घटक पक्षांना जागा मिळणार नाहीत. त्यामुळे ठाकरे गटाशी युती केलेल्या घटक पक्षांच्या वाट्याला या गणितानुसार एकही जागा येणार नाही. मात्र, ठाकरे गटाकडून त्यांच्यासाठी काही जागा सोडण्यात आल्या, तर जागावाटपाचं गणित वेगळं दिसू शकेल.

२०१९ची आकडेवारी काय सांगते? दरम्यान, २०१९च्या आकडेवारीनुसार, ४८ जागांपैकी भाजपानं २३, तत्कालीन उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं १८, राष्ट्रवादी काँग्रेसनं ४ तर काँग्रेस आणि एमआयएमनं प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला होता.