मराठा आरक्षणासाठी मुस्लिमांचे उपोषण

0
311

पुणे, दि. ३१ (पीसीबी) : मराठा आरक्षणासाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील उपोषणाला बसले आहेत. त्याच दरम्यान मराठवाड्यातील बीड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत सोमवारी हिंसाचाराचा घटना घडल्या आहेत. बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर आणि माजलगावमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरांची जाळपोळ झाल्याची घटना घडली आहे. त्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे.या सर्व घडामोडी दरम्यान आज पुण्यातील कोंढवा परिसरात ‘दि मुस्लिम फाऊंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक गफूर पठाण यांच्या नेतृत्त्वाखाली मुस्लिम समाजातील नागरिक लाक्षणिक उपोषणाला बसले आहेत.

‘एक मराठा, लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं’ अशी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. यावेळी गफूर पठाण म्हणाले की, मागील सहा दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. मात्र त्यावर राज्य सरकार कोणत्याही प्रकारची भूमिका मांडताना दिसत नाही. त्या पार्श्वभूमीवर आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आज लाक्षणिक उपोषण करीत आहोत. राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा अधिक तीव्र लढा उभारला जाईल, असा इशारा यावेळी पठाण यांनी दिला.