नवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) – अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना मावळचे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, केंद्रीय अर्थसंकल्पात सर्वच घटकांतील लोकांना दिलासा मिळाला आहे. पहिल्यांदा मध्यमवर्गीयांनाही मोठा दिलासा दिला आहे. सात लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. लघु व मध्यम उद्योगांना चालना मिळणार आहे. त्यासाठी 9 हजार कोटी रुपयांचा अधिकचा निधी दिला जाणार आहे. सूक्ष्म, मध्यम, लघु उद्योगांसाठी क्रेडिट सिस्टीम फायदेशीर ठरणार आहे. औद्योगिकनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील लघुउद्योजकांना मोठा फायदा होणार आहे. लघुउद्योगाला बळकटी येईल.
विकास आणि रोजगार निर्मितीला गती देणे आणि आर्थिक स्थिरता मजबूत करणे यावर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. शेतक-यांसाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त महिला सन्मान बचतपत्र योजना जाहीर केले आहे. या योजनेत 2 लाख रुपये गुंतवणुकीची संधी. वार्षिक 7.5 टक्के व्याज मिळणार आहे. पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी अॅपवर सर्व आवश्यक सुविधा पुरवण्याची योजना आणली जाणार आहे. पंतप्रधान आवास योजनेसाठी आर्थिक तरतूद 66 टक्क्यांनी वाढवून 79 हजार कोटी रुपये केली जाणार आहे.
शहर पायाभूत विकास निधीसाठी दरवर्षी 10 हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे शहरविकासाला वेग येईल. पायाभूत सुविधांना सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. पर्यावरण संरक्षण करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असल्याचे खासदार बारणे म्हणाले.