पिंपरी,दि.०२(पीसीबी) – भामा आसखेड प्रकल्पातून पाणी आणण्यासाठी उभारण्यात येणा-या जॅकवेल व पंप हाऊसच्या खर्चात 22 कोटींनी वाढ होणार आहे. कामाची मूळ अंदाजपत्रकीय तरतूद 150 कोटी होती. सुधारीत अंदाजपत्रकीय रक्कम 172 कोटी रुपये करण्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी (मंगळवारी) मान्यता दिली.
भामा आसखेड धरणातील 167 एमएलडी पाणी महापालिकेसाठी आरक्षित आहे. ते पाणी उचलण्यासाठी महापालिक धरणाजवळ वाकी तर्फे वाडा येथील 1.20 हेक्टर जागेत 200 दशलक्षलिटर (एमएलडी) प्रतिदिनी क्षमतेच्या अशुद्ध जलउपसा केंद्रासाठी जॅकवेल, अॅप्रोच ब्रीज, सबस्टेशन बांधणार आहे. तेथून नवलाख उंब्रे येथील ब्रेक प्रेशर टँक पर्यंत पाणी आण्यात येणार आहे. तेथून चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणले जाणार आहे.
महापालिकेच्या सन 2022-23 च्या अंदाजपत्रकात भामा आसखेड प्रकल्पाच्या कामाअंतर्गत जॅकवेल व पंप हाऊस बांधणे या आशयाचे काम आहे. कामाचे नाव अपु-या स्वरुपाचे आहे. या कामास अंदाजयपत्रकीय रक्कम कमी आहे. त्यामुळे कामाच्या नावात बदल आणि सुधारीत अंदाजपत्रकीय रक्कमेमध्ये बदल करण्यात आला. या कामाची मूळ अंदाजपत्रकीय रक्कम 150 कोटी रुपये इतकी आहे. वस्तू व सेवा कर (जीएसटी) 18 टक्के, सल्लागाराची फी 5 टक्के आणि 10 वर्षे देखभाल दरुस्ती करणे. नवीन दरसुचीच्या दरामध्ये वाढ झाल्याचे कारण देत अंदाजपत्रकीय रक्कमेमध्ये वाढ करण्यात आली आहे. कामाची मूळ अंदाजपत्रकीय रक्कम 150 कोटी होती. ती आता 172 कोटी रुपये केली. त्यामुळे जॅकवेल व पंप हाऊस बांधण्याच्या खर्चात 22 कोटींनी वाढ होणार आहे.
जॅकवेल व पंप हाऊस बांधणे या कामाच्या नावातही बदल केला आहे. भामा आसखेड धरणाजवळ वाकी तर्फे वाडा येथे अशुद्ध जलउपसा केंद्र बांधणे व त्यासाठी जॅकवेल, पंपहाऊस, अँप्रोच ब्रीज, इंटेक चॅनेल बांधणे व विद्युत, यांत्रिकी, इन्स्ट्रुमेंटेशन, स्काडासह इतर अनुषंगिक कामे करणे आणि 10 वर्षे देखभाल दुरुस्ती करणे असे नामकरण करण्यात आले.