भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर!

0
298
  • शहराध्यक्ष शंकर जगताप यांची माहिती
  • आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर “महाविजय २०२४” घर चलो अभियान

पिंपरी, दि. ९ (पीसीबी)-आगामी लोकसभेची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने ‘महाविजय- २०२४’ अभियान सुरु केले आहे. महाराष्ट्रातून महायुतीला ४५ पेक्षा जास्त जागा मिळाव्यात, असा निर्धार केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मावळ लोकसभा प्रवास दौरा, घर चलो अभियानाच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पिंपरी-चिंचवडचा दौरा करणार आहेत, अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिली.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दि. ११ ऑक्टोबर २०२३ रोजी पिंपरी-चिंचवडचा दौरा नियोजित केला आहे. याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष जगताप बोलत होते.

शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे राज्यात निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. त्यानुसार, विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. यासाठी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा राज्यभरातील संपूर्ण ४८ लोकसभा मतदारसंघांचा दौरा सुरू आहे. त्याअनुषंगाने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचे बुधवारी सायंकाळी ४ वाजता किवळे-मुकाई चौक येथे आगमन होवून त्यांचे शहर भाजपा, ‍महिला मोर्चा व युवा मोर्चाच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात येईल.

‘भाजपा वॉरियर्स’शी साधणार संवाद…
पिंपरी-चिंचवड येथे मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदारसंघांतील ‘भाजपा वॅारियर्स’ शी संवाद साधणार आहेत. यानंतर सायंकाळी ६ वाजता ‘घर चलो अभियान’ अंतर्गत पिंपरी, राधिका चौक येथून अभियानाला सुरुवात होईल. त्यानंतर, शगुन चौक व साई चौक परिसरातील‍ नागरिकांची भेट घेतील. त्यांना पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाच्या ९ वर्षातील लोकोपयोगी योजनांची माहिती देतील. या ठिकाणी त्यांच्या ‘रोड शो’चे आयोजन देखील करण्यात आले असून, यामध्ये दुर्लक्षित झालेल्या व बलुतेदार असलेल्या कारागिर – शिल्पकार यांना विकसीत करण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने हाती घेतलेल्या पी एम विश्वकर्मा योजनेची माहिती देण्यात येणार आहे. साई चौक येथे नागरिकांना संबोधून भाषणाने कार्यक्रमाचा समारोप होईल.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार, मावळ लोकसभा मतदार संघातील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठका घेण्यात येत आहे. या बैठकीत भाजपाचे ‘महाविजय- २०२४’ संदर्भात चर्चा करण्यात येत आहेत. त्यासाठी मावळ लोकसभा मतदार संघातील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, वॉरिअर्स, बूथप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, घराघरांत पोहचणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा सज्ज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात पुन्हा एकदा भाजपा महायुती सरकार स्थापन होईल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.

  • शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड.