मुंबई, दि. १२ (पीसीबी) : ‘मिशन लोकसभा’ हे घोष्यवाक्य घेऊनभाजपाने लोकसभा निवडणुकींची रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. शिवाय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर तर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून पक्ष संघटन आणि निवडणूकीची रणनीती ठरवण्यासाठी केंद्राचे ९ मंत्री राज्यात दाखल झाले आहेत. कल्याण लोकसभा मतदार संघात अनुराग ठाकूर हे दाखल झाले असून त्यांनी संघटनात्मक बैठकांवर भर दिला आहे. गेल्या दोन टर्ममध्ये या मतदार संघात भाजपाचा उमेदवार निवडून आला आहे, २०२४ मध्येही ही परंपरा कायम राहणार असल्याचा विश्वास अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केलाय. ते तीन दिवस या मतदरासंघात असून पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत.
राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघापैकी किमान ४५ मतदारसंघावर कमळ फुलवण्याचा निर्धार भाजपाकडून केला जात आहे. त्याअनुशंगाने निवडणूकांचे प्लॅनिंग केले जात आहे. तर ज्या मतदार संघात भाजपाचा उमेदवार निवडून आलेला नाही, तिथे अधिकचे लक्ष देण्याचा प्रयत्न होत आहे. अनुराग ठाकूर यांच्यावर कल्याण मतदार संघाची जबाबदारी पक्षाने दिली आहे. शहरात पक्षाचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद साधत दौऱ्याची सुरुवात केली.
भाजपाचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनीधी यांच्याशी संवाद साधून मतदार संघातील राजकारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवाय ज्या भागात नकारात्मक वातावरण आहे त्या ठिकाणी पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. तर केंद्राने जनतेच्या हितासाठी घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहचण्याचे त्यांनी अवाहन केले आहे. त्यामुळे पक्षाचे कार्य स्थानिक पातळीवर पोहचून जनतेमध्ये जनजागृती करण्याचेही ठाकूर सांगत आहेत.
लोकसभा निवडणूकांना भाजपाचा मेगा प्लॅन सुरु असून पक्ष वाढीसाठी आणि लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राज्यातील १६ लोकसभा मतदार संघात ९ केंद्रीय मंत्री दाखल होत आहेत.या दरम्यानच्या काळात धोरणात्मक बदल, स्थानिक पातळीवरील अडचणी, संघाटनात्मक कार्यक्रम, धार्मिक स्थळांना भेटी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी असे कार्यक्रम नियोजित आहेत.
बारामती लोकसभा हा पवार यांचा घरचा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत यावेळी खेचून घ्यायचाच असा निश्चय भाजपाने केला आहे. त्याशिवाय शरद पवार आणि अजित पवार यांचे पुणे, मावळ, शिरुर या जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघातीलही मक्तेदारी मोडीत काढायचे भाजपाने ठरवले आहे. शिवसेनेचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे हे शिंदे गटात सामिल झाले, पण तेच आगामी काळात भाजपाचे उमेदवार असणार आहेत, अशी चर्चा आहे. त्याच पध्दतीने शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीसुध्दा शिंदे गटात प्रवेश केला असून त्यांना भाजपाकडून शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार असे सांगण्यात येते. भाजपाने त्या दृष्टीने या मतदारसंघांची बांधनी सुरू केली असून मंत्री तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे स्वतः लक्ष ठेऊन आहेत.