भाजपाचे तारणहार अमित शाह

0
67

भाजपचे नेते अमित शाह यांचा आज वाढदिवस. देशात भाजपचे तारणहार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अगदोर वर्षभर भाजपमध्ये आलेले शाह यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा.

गुजरात, दि. 22 (पीसीबी) : जन्म- २२ ऑक्टोबर १९६४ मुंबई येथे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली भाजपा खऱ्या अर्थाने देशभरात पोहचला. अमित शाह यांचे वडील अनिल चंद्रा शाह हे मानसा येथील उद्योजक होते. त्यांचा पी. व्ही. सी पाईपचा व्यवसाय होता. अमित शाह यांनी आपले शालेय शिक्षण गुजराथ मधील मानसा येथे पूर्ण करुन ते बायोकेमिस्ट्रीमधील शिक्षण घेण्यासाठी अहमदाबादला गेले. त्यांनी बीएससीपर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर ते वडिलांचा व्यवसाय संभाळू लागले. आपल्या विद्यार्थी जीवनापासूनच अमित शाह भाजपासाठी काम करत होते. लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारांमध्ये वाढलेल्या अमित शाह यांनी पदवी शिक्षणाच्या वेळी संघाचे सदस्यत्व स्वीकारले. १९८३ ते १९८६ दरम्यान तीन वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काम केल्यानंतर त्यांनी १९८६ साली भाजपामध्ये प्रवेश केला.
नरेन्द्र मोदी यांनी अमित शाह यांच्यानंतर एक वर्षाने म्हणजेच १९८७ साली भाजपामध्ये प्रवेश केला. १९८६ साली भाजपामध्ये येण्याआधी शाह स्टॉक ब्रोकर म्हणून काम करत असत. १९८६ साली त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करत सक्रीय राजकारणात पहिले पाऊल टाकले तरी अमित शाह यांना पहिल्यांदा १९९५ साली केशुभाई पटेल यांच्या सरकारच्या काळात महत्वाची जबाबदारी देण्यात आली. केशुभाई यांनी अमित शाह यांची नियुक्ती गुजरात राज्य वित्त महामंडळाच्या अध्यक्षपदी करण्यात आली. १९८२ साली नरेंद्र मोदी व अमित शाह यांची पहिली भेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अहमदाबाद येथील एका कार्यक्रमात झाली. त्यावेळी मोदी हे संघाचे प्रचारक होते. अहमदाबाद शहरामधील तरुणांसाठी अमित मोदी काम करत होते.

अमित शाह यांनी १९९१ साली लालकृष्ण अडवाणींसाठी तर १९९६ साली अटल बिहारी वाजपेयी यांच्यासाठी निवडणूक प्रचाराची धुरा संभाळली. या दोन्ही निवडणुकांमधून शाह पक्षासाठी निवडणुकीच्या काळातील चांगले प्रचारक आणि व्यवस्थापक म्हणून नावा रुपास येण्यास सुरुवात झाली. सर्खेजमधून अमित शाह सलग चार वेळा (१९९७ (पोटनिवडणूक), १९९८, २००२, २००७) विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. २००२ साली गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये मोदी मोठ्या फरकाने निवडून आल्यानंतर शाह यांच्याकडे अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. यामध्ये गृहखाते, संसदीय कार्यमंत्री, कायदा आणि सुव्यवस्था या संदर्भातील जबाबदारी शाह यांच्याकडे देण्यात आली. २०१० साली अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप झाले. गृहमंत्रालयाचे प्रभारी राज्यमंत्री असताना शाह यांचा दोन खोट्या एन्काऊण्टमध्ये सहभाग असल्याचे आरोप करण्यात आले. या आरोपांमुळे शाह यांना राजीनाम द्यावा लागला. याच प्रकरणी नंतर त्यांना अटकही झाली. मात्र या प्रकरणात कोणतेही सबळ पुरावे न मिळाल्याने त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सोहराबुद्दीन चकमक प्रकरणी दोषी अढळल्याने सर्वोच्च न्यायलयाने अमित शाह यांना दोन वर्षांसाठी गुजरातमध्ये येण्यास बंदी घातली होती. २०१० ते २०१२ दरम्यानच्या या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये शाह यांचे वास्तव्य दिल्लीमध्ये होते. त्यांनी या कालावधीमध्ये दिल्लीमध्ये विविध क्षेत्रांमधील ज्येष्ठ व्यक्तींच्या भेटीगाठी घेत पक्षाचे काम सुरु ठेवले. २०१४ साली भाजपाने मोदींच्या नेतृत्वाखाली बहुमत मिळवले. या निवडणुकीच्या नियोजनाचे श्रेय अमित शाह यांना देण्यात आले. आणि याच विजयाबरोबर त्यांची सेकेण्ड इनिंग खऱ्या अर्थाने सुरु झाली.

उत्तर प्रदेशमधील लोकसभा निवडणुकींची धुरा शाह यांच्या हाती देण्यात आली होती. शाह यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने राज्यात न भूतो न भविष्यती अशी कामगिरी करुन दाखवली. पक्षाने ८० पैकी ७३ जागा जिंकल्या. २०१४ साली लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाने अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर अमित शाह यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद देण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर, आसाम, उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये सत्ता स्थापन केली. तर मणिपूरमध्येही भाजपाने आपला जोर दाखवला. अनेक राज्यांमध्ये शाह यांची जादू चालली असली तरी ते राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या पंजाब, दिल्ली आणि बिहारमधील विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाचा पराभव झाला होता