भाजपने कमिशन मिळणारी कामे केली, कुत्र्यांच्या नसबंदीला सोन्याचे उपकरण वापरले होते की काय? – अजित पवार

0
311

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – मागील पाच वर्षात पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपने कमिशन मिळणारी कामे केली. ज्यातून जास्त कमिशन मिळेल, ते काम करण्यात भाजपला रस होता. कुत्र्यांच्या नसबंदीत कमिशन मिळविले. साडेसहा कोटी रुपयांची कसली नसबंदी केली. ती ही लॉकडाऊनच्या कालावधीत, नसबंदीसाठी सोन्याचे उपकरण वापरले होते की काय नसबंदीत, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. मला माझ्या विचाराचे १०० नगरसेवक निवडूण द्या मी शहराचे सगळे प्रश्न मार्गी लावतो, अशी ग्वाही देत त्यांनी एकप्रकारे निवडणूक प्रचाराचा नारळच फोडला. आपण आता वारंवार शहरात येणार असल्याचे सांगत भाजपाला साधा पाण्याचा प्रश्न सोडविता आला नाही, अशी खरमरीत टीका त्यांनी केली. मला सत्ता द्या मी रोज मुबलक पाणी देतो, असे आश्वासन त्यांनी दिले.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा आज (शुक्रवारी) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात मेळावा झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. आमदार अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिलाध्यक्षा कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख, माजी महापौर संजोग वाघेरे, योगेश बहल, मंगला कदम, माजी नगरसेवक नाना काटे, भाऊसाहेब भोईर आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाट्यगृह खचाखच भरून गेले होते. शहरातील विविध २० प्रकल्पांची उद्घाटने अजित पवार यांच्या हस्ते कऱण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या शहर कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांना पदांचे वाटप त्यांनी केले.

अजित पवार म्हणाले, भाजपला पाच वर्षात आंद्रा, भामा-आसखेड धरणातून पिंपरी-चिंचवडकारांकरिता पाणी आणता आले नाही. भाजपने पाच वर्षे काय केले, अजून दररोज पाणी देऊ शकत नाहीत. ज्यांच्या अंगातच पाणी नाही ते काय रोज पाणी देणार आहेत. मी शहरवासीयांना दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी राजकीय स्टंटबाजी करणार नाही. प्रश्न सोडविण्याची धमक, ताकद आमच्यात आहे. आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे १०० नगरसेवक निवडून द्या. शहरवासीयांना दररोज पिण्यासाठी पाणी देण्यासह सर्व प्रश्न मार्गी लावून दाखवतो.

शहरात सध्या इव्हेंट सुरु झाले आहेत. जेसीबी, बोलोरो देत आहेत. यांचे काही खरे नाही. लबाडा घरचे अवतान आहे. जेवल्याशिवाय कळत नाही असे म्हणत भाजप आमदार महेश लांडगे यांनाही टोला लगाविला. पिंपरी चिंचवड शहरात मेडिकल कॉलेज काढण्याचा विचार मी करतो आहे. त्याशिवाय थेरगावला कॅन्सरवर ट्रीटमेट करणारे स्वतंत्र हॉस्पिटल सुरू कऱण्याचा विचार आहे. महापालिकेची सर्व हॉस्पिटल २४ तास सुरू ठेवणार असेही त्यांनी स्पष्ट केले.