भाजपचा मोठा डाव! हेमंत सोरेन यांच्या भावजय सीता सोरेनचा भाजप प्रवेश

0
159

ईडी, सीबीआय च्या दबावाने पक्ष, कुटुंब फोडायचा फंडा भाजपने कायम ठेवला आहे. महाराष्ट्रात ठाकरेंची शिवसेना फोडली. देशात मोदींच्या विरोधात विरोधकांची इंडिया आघाडीची मोट बांधण्यात पुढाकार घेणाऱ्या शरद पवार यांचे कुटुंबसुध्दा फोडले. आता त्याच पध्दतीने झारखंड मध्ये सोरेन कुटुंब फोडण्यात भाजपला यश आले आहे. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीत ‘चारशे पार’चा नारा देत महाविजयाचा संकल्प केला आहे. यासाठी साम-दाम-दंड- भेद अशा सर्वच पर्यायांचा वापर करत फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे.

एनडीएची ताकद वाढविण्यासोबतच प्रादेशिक पक्षांना सामावून घेण्यासाठी भाजप कसोशीने प्रयत्न करत आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केल्यामुळे राजकीय खळबळ उडाली असतानाच आता भाजपने मोठा डाव टाकला आहे.सोरेन यांच्या भावजय सीता सोरेन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आमदार सीता सोरेन यांनी झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचा राजीनामा दिला आहे.यासोबतच त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला आहे.यामुळे एकच खळबळ उडाली आहे.सीता ह्या झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख शिबू सोरेन यांच्या सून असून माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या भावजय आहेत. यामुळे सोरेन कुटुंबात फूट पडल्याची चर्चा आहे.

सीता सोरेन यांनी दिल्ली येथे भाजप प्रवेश केला.त्या दुमका येथून भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.त्या आतापर्यंत तीनदा आमदार राहिल्या आहेत. हेमंत सोरेन मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्या पक्षावर नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे.

सीता सोरेन यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच पक्षावर गंभीर आरोप केला आहे.त्यांनी पत्र लिहून पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पतीच्या निधनानंतर मला आणि माझ्या कुटुंबाला सातत्याने डावलले गेले.पक्षात आणि कुटुंबात दुजाभाव करण्यात आला. हे आमच्यासाठी वेदनादायी होते, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे. हेमंत सोरेन यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे आले. ज्याला सीता सोरेन यांनी कडाडून विरोध केला होता.