भागीदाराच्या दुचाकीचा अपहार अन बचत खात्यातील लाखो रुपयेही केले लंपास

0
229

भोसरी, दि.१५ (पीसीबी)- व्यवसायातील भागीदाराची दुचाकी कामासाठी घेऊन तिचा अपहार केला. तसेच व्यवसायाच्या बँक खात्यातील पाच लाख रुपये देखील लंपास केले. याप्रकरणी भागीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १७ मे २०२२ रोजी भोसरी येथे घडला.

सुजित चंद्रकांत जाधव (वय २५, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. १४) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिरोज शहाबुद्दीन अन्सारी (रा. मोहननगर, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील चंद्रकांत जाधव आणि आरोपी अन्सारी यांनी भागीदारीत ट्रान्सपोर्ट गाड्यांच्या बॉडी बनविण्याचा व्यवसाय सुरु केला. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी चंद्रकांत जाधव यांचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर सुजित यांनी शॉपमध्ये जाण्यास सुरुवात केली. ही बाब अन्सारी याला खटकत होती. एके दिवशी अन्सारी हा सुजित यांचा घरी आला. पुण्यात काम आहे, त्यामुळे तुझी दुचाकी दे, असे म्हणून सुजित यांची दुचाकी अन्सारीने नेली. दुचाकीचा अन्सारीने अपहार केला. तसेच व्यवसायाच्या बचत खात्यावरील पाच लाख रुपये देखील अन्सारी याने नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.