`भाऊ` नावाचे वादळ शमले, शहरात भाजप पोरकी… थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
592

 पिंपरी, दि. 3 (पीसीबी)-आमदार लक्ष्मण जगताप तथा भाऊ गेले. पिंपरी चिंचवडच्या राजकारणातील एक सुवर्ण अद्याय संपला. पिंपरी चिंचवडमधील एक नेता नव्हे तर राजा माणूस काळाच्या पडद्या आड गेला. अफाट लोकसंग्रह असलेले, सतत कार्यकर्त्यांच्या गर्दीत राहणारे, विकास कामांचा ध्यास घेणारे, दूरदृष्टीचे मुरब्बी, मुत्सद्दी, सेवाभावी नेते म्हणजे लक्ष्मण भाऊ. दिसायला धिप्पाड, उंचेपूरे, राकट, पण आतून मायेचा पाझर. बोलायला रोखठोक, स्पष्ठ, अगदीच कठोर, पण तितकेच कनवाळू. अगदी नारळासारखे टणक, पण आतून गोड खोबरे आणि शितल पाणी. काम करतो, बघतो असली भंपक आश्वासने नाहित. काम होत असेल तर `हो` नसेल तर तोंडावर `नाही` म्हणणारे दुर्मिळ नेतृत्व. एक घाव दोन तुकडे, असली कार्यशैली. पिंपरी चिंचवडच्या परावलंबी, सरधोपट राजकारणाला स्वतःच्या ताकदिवर सामर्थ्यावर एकदम कलाटणी देणारे या मातीतले अस्सल `लिडर`. ५० वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर या भूमितले कसदार नेतृत्व तयार झाले होते, पण नियतीची दृष्ट लागली. शहराची सगळ्यात मोठी कमतरता कोणती तर या शहराला या मातीतला नेता नव्हता. लोक भाऊंकडे त्या नजरेतून पाहत होते. वर्षोनवर्षे घाम गाळल्यावर, अनेक टक्केटोणपे खाऊन, पराभव पचवून, दोन पिढ्या खपल्यावर असे कसदार अनुभवसंपन्न नेतृत्व निपजले होते. केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत भाजपची सत्ता होती म्हणून भाऊ मंत्री होणार असल्याच्या चर्चा होत्या.

थोडक्यात त्या तोडिचे एक निर्णायकी नेतृत्व या शहराला मिळाले होते. पाच वर्षे सुगीचे अनुभवले आणि अचानक दैवाने साथ सोडली. खरे तर, राजकारणाचे बाळकडू भाऊंना त्यांच्या घरातूनच मिळाले. पिंपळे गुरवची पाटिलकी जगतापाकांकडेच कायम होती. त्यातच वडिल पाडुरंग जगताप हे हवेली पंचायत समितीचे सदस्य होते. पिंपरी चिंचवड नगरपालिकेची १९८२ मध्ये महापालिका झाली. वाकडसह पिंपळे गुरव, पिंपळे निलखचा महापालिकेत समावेश झाला. नंतर १९८६ मध्ये महापालिकेच्या निवडणुका लागल्या. समाजवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे जेष्ठ नेते नाना शितोळे यांनी शिफारस केली आणि भाऊ प्रथम नगरसवेक झाले. विलास लांडे, लक्ष्मण जगताप आणि संजोग वाघेरे हे त्रिकूट नाना साहेबांच्या तालमित तयार झालेले. पुढे स्वकर्तृत्वार भाऊ सलग चार वेळा नगरसेवक झाले. स्थायी समिती अध्यक्ष नंतर महापौर झाले. राजकारणातील असा चढता आलेख कायम राहिला. तेव्हापासून सलग ३५ वर्षे महापालिका, विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकांना पिंपळे गुरव, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, वाकड, रहाटणी हा भाऊंची हुकूमत असलेला परिसर कायम राहिली. अवघ्या २१ व्या वर्षी नगरसेवक झाले आणि तब्बल ३५ वर्षे दमदार राजकारण, समाजकारण केले.

भाजपमुळे `भाऊ` की भाऊंमुळे `भाजप` अशी चर्चा ज्या ज्यावेळी व्हायची त्यावेळी उत्तर एकच होते, किमान पिंपरी चिंचवडमध्ये जी काही भाजप सत्तेत आहे, ती केवळ आणि केवळ आमदार लक्ष्मण जगताप यांच्यामुळे. अजित दादांच्या साम्राज्यात राष्ट्रवादीला चॅलेंज करून भाजपची सत्ता आणायची हे काही खायचे काम नव्हते. त्यासाठीचा पैसा, ताकद भाऊंकडे होतीच, पण सर्वात महत्वाचे म्हणजे दिमतीला कार्यकर्त्यांचे प्रचंड जाळे होते. पण सर्वात गरजेचे म्हणजे या शहरात विजयश्री खेचून आणणारे चेहरे पारखण्याचे कसब फक्त आणि फक्त लक्ष्मण जगताप यांच्याकडेच होते. कोणत्या वार्डात कोण उमेदवार चालू शकतो, कोणाची ताकद किती, वकूब किती, पोहच किती ते फक्त तेच सांगू शकत. गल्लीत कोणत्या जातीचे अथवा धर्माची मते किती, कोण कोणाचे नातेवाईक, कोणाची निष्ठा कुठे याची इत्थंभूत माहिती असणारे भाऊच होते, दुसरा तसा नेता आज शहरात शोधून सापडणार नाही.

पवार यांच्यासारख्या नेत्यापुढे झुकणारे अनेक नेते आहेत, पण ताठ मानेने डोळ्यात डोळा घालून बोलणारे फक्त आमदार जगतापच होते. ३०-३५ वर्षे राबल्याने ते सगळे अनुभवाचे बोल होते. मावळ लोकसभेला थेट लाल बावटा हातात धरून विचाराशी भीन्न अशा शेकापची उमेदवारी घेण्याची एकमेव घोडचूक त्यांना नडली… पण त्यातून ते शहाणे झाले आणि भाजपच्या मदतीने भाऊ नावाचे एक संस्थान या शहरात तयार झाले. भाजपच्या काळात पाच वर्षे महापालिकेत महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष जे जे झाले त्यातले बहुतांशी भाऊंचेच समर्थक. महापालिकेचा कुठलाही निर्णय असू देत तिथे भाऊंचाच शब्द प्रमाण मानला जायचा. भोसरीकर आमदार महेश लांडगे भाजपाचे शहराध्यक्ष झाले, पण निर्णायक समयी मत भाऊंचेच ग्राह्य होते, कारण अनुभव मोठा होता. भाऊ ज्यावेळापासून आजारी पडले तेव्हापासून भाजपाच्या तमाम नेते, नगरसवेक, कार्यकर्त्यांनी मनातून धस्का घेतला. कारण लक्ष्मणभाऊ जगताप यांच्याशिवाय भाजपा ही कल्पनाच करवत नाही. शहर सांभाळायचे तर ती धमक, तो जोश पाहिजे तो फक्त भाऊंकडे होता.

आमदार महेश लांडगे तसे खमके व्यक्तीमत्व, पण भाजपाचे शहराध्यक्ष होऊनही ते फक्त भोसरीपूरतेच राहिले. भाऊ चिंचवडचा विचार करत, पण पाणी, पूल, रस्ता, दळणवळण असे विषय असतं त्यावेळी पूर्ण शहर डोळ्यासमोर ठेऊन निर्णय घेत. महेश लांडगे नेते झाले, शहराच्या योजनांचा विचार करत गेले, पण शहर म्हणून भाजप संघटनेची उभारणी जगताप यांच्यासारखी करण्यात ते थोडे कमीच पडले. जगताप यांच्याशिवाय भाजप आज पोरकी आहे. संघ आणि निष्ठावंत भाजपयींचे भाऊंशी विशेष सूत जुळले नाही, कारण त्यांचा स्वभाव. पण सत्तेच्या राजकारणासाठी ना रा.स्व.संघात ना भाजपाच्या जुण्याजाणत्यांमध्ये दुसरे भाऊ पैदा झाले. समाजाची नस माहिती पाहिजे, समस्यांची जाण पाहिजे, त्यातून कायदे पाळून व्यवहार्य मार्ग काढला तर तो नेता तयार होतो. आज त्या क्षमतेचा दुसरा नेता किमान पिंपरी चिंचवड भाजपाच्या पदरी दिसत नाही, म्हणून कार्यकर्त्यांच्या मनात धस्स होते. पुढे सगळा काळोख दिसतो.

जगताप यांनी शहरात भाजपला सत्ता मिळवून दिली, पण महेश लांडगे ते करू शकतील का याबाबत थोडी साशंकता आहे. कारण माणसे पारखण्याचे, ती जोडून ठेवण्याचे जे गूण जेष्ठ नेते शरद पवार, अजित पवार यांच्याकडून जगताप शिकले ते दुसरे कोणामध्ये दिसत नाहीत. जगताप मावळ लोकसभेला अपक्ष शेकापचे उमेदवार म्हणून लढणार तेव्हा जी पहिली सभा त्यांच्या घरासमोर झाली तेव्हाचा अफाट जनसमुदाय आठवतो. गर्दी आणि भाऊ हे अगदी जसे पवार काका पुतण्यांबाबतचे समिकरण आहे तसेच ते लक्ष्मण जगताप यांच्याबाबत होते. जगताप यांच्या वाढदिवसाला पिंपळे गुरवला एतकी गर्दी असे की दोन दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागत. विधानसभेला एकदा उमेदवारी नाकारण्यात आली त्यावेळी त्यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनाला जो दहा हजाराचा अथांग जनसागर लोटला होता, तो आज स्मरतो. शहरात इतकी लोकप्रियता आणि लोकांचे तितकेच प्रेम फक्त शरद पवार, दिवंगत प्रा. रामकृष्ण मोरे सर आणि अजित पवार यांनाच मिळाले. भाजपाकडे असाच एक हिरा दहा वर्षांपूर्वी होता, ते म्हणजे जेष्ठ दिवंगत नगरसवेक भाजपचे शहराध्यक्ष अंकुशराव लांडगे. त्यांची हत्या झाल्याने भाजपा खचली होती, पण जगताप यांनी ती कसर भरून काढली आणि भाजपाला सोन्याचे दिवस आणले.

भाजपाला आता खऱ्या अर्थाने जगताप यांची कमी जाणवेल… कारण त्या तोडिचे, त्या दमाचे दुसरे लक्ष्मण जगताप या शहरात दूरदूरवर शोधून दिसत नाहीत. भोसरीचे आमदार महेश लांडगे आमदार जगताप यांना भेटायला गेले त्यावेळी रुग्णालयात ढसाढसा रडले, कारण त्यांनाही कळून चुकले की उद्याच्याला त्यांच्या मानेवर किती मोठी जबाबदारी येणार आहे. आजवर लांडगे यांना मोठ्या भावासारखी म्हणजे अगदी राम-लक्ष्मण जोडिसारखी साथ होती, आता ती नसणार आहे. म्हणूनच म्हणतो भाजपसाठी आत पुढचा काळ कठिण आहे. फडणवीस, शेलार, पाटील यांना आता नाही पण उद्याच्या निवडणुकिला लक्ष्मण जगताप यांची कमतरता जाणवेल. कदाचित भाजप पुन्हा या शहरात सत्तेच्या जवळ पोहचणेसुध्दा खूप कठिण असेल. भाजपची सत्ता यावी म्हणून जी मोट आमदार जगताप यांनी बांधली ते जुगाड जमविणारा दुसरा नेता दिसत नाही. आमदार महेश लांडगे अजित पवार यांना तोंड देऊ शकत नाहीत, कारण त्यांचा तो घास नाही. प्रसंगी ते सरळ सरळ अजित दादांना शरण जातील. आमदार जगताप यांचे अकाली जाणे हे सर्वाधिक कोणाच्या तोट्याचे असेल तर ते भाजपच्या आहे. म्हणूनच देशात भाजप बलाढ्य असेल, पण पिंपरी चिंचवड शहरात भाजप आज पोरकी आहे… आदऱणीय भाऊंना आमची अखेरची भावपूर्ण श्रध्दांजली !!!