बांधकामे बंद ठेवताना प्रथम मजुरांची सोय लावा – स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष सिमा सावळे यांची मागणी

0
511

पिंपरी, दिं. १४ – पिंपरी चिंचवड शहरातील हवा प्रदुषण कमी कऱण्यासाठी पुढचे आठवडाभर म्हणजे १९ नोव्हेंबर पर्यंत सर्व बांधकामे बंद ठेवण्याचे लेखी आदेश महापालिका प्रशासनाने काढल्याने बांधकाम क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, प्रशासनाच्या या आदेशामुळे हातावर पोट असणाऱ्या हजारो बांधकाम मजुरांची मोठी उपासमार होणार असून या कष्टकऱ्यांची दिवाळी कडू झाली आहे. सर्व बांधकाम मजुरांना दोन वेळचे जेवण, नाष्टा आणि आठवड्याची मजुरी देण्याची सोय बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाई मार्फत महापालिका प्रशासनाने करावी, अशी लेखी मागणी स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष तथा पिंपरी चिंचवड बांधकाम मजूर व असंघटीत कामगार संघाच्या सरचिटणीस सिमा सावळे यांनी केली आहे.

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात सावळे म्हणतात, वाहनांचा धूर, बांधकाम साईट्स तसेचफटाक्यांमुळे शहरातील हवा प्रदुषित झाली हे मान्य आहे. प्रामुख्याने भोसरी सर्वाधिक प्रदुषित झाली आहे, तर त्या खालोखालवाकडमधील भूमकर चौक, निगडी या भागातील हवेची गुणवत्ता सर्वांत खराब श्रेणीत नोंदली गेली. उपाय म्हणून महापालिका प्रशासनाने शहरातील सर्व बांधकामे आठ दिवसांसाठी म्हणजे १९ नोव्हेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय केला. प्रत्यक्षात या निर्णयाचा सर्वात मोठा फटका शहरातील विविध बांधकाम साईट्सव्र काम करणाऱ्या गोरगरिब मजुरांना बसणार आहे. हातावर पोट अणाऱ्या या घटकाचा रोजगार बुडणार आहे. रोजच्या रोज काम केले तरच पगार मिळतो, अशी परिस्थिती असल्याने या कष्टकऱ्यांना आठवडाभर काम नसेल तर पगार मिळणार नाही. महापालिका प्रशासनाने याचा कुठेतरी गांभीर्याने विचार करण्याची नितांत गरज आहे. प्रदुषण पातळी कमी झाली पाहिजे यात दुमत नाही, पण गरिबाच्या पोटावर पाय देऊन निष्ठुरपणे असे निर्णय करणार असाल तर ते दुर्दैवी म्हणावे लागतील. राज्य सरकारकडे बांधकाम कामगार कल्याण निधी आहे. कोरोना काळात सर्व बांधकामे बंद असताना या मजुरांना त्यातून मोठी मदत करण्यात आली होती. दोन वेळच्या भोजनाची सोयसुध्दा झाली होती. आतासुध्दा महापालिका प्रशासनाने त्याच पध्दतीने या बांधकाम मजुरांच्या पोटापाण्याचा आणि मजुरीचा विचार केला पाहिजे. बांधकाम मालकांची संघटना असलेल्या क्रेडाईची सुध्दा या कामात मोठी मदत मिळू शकते. आयुक्तांनी या मागणीचा ताबडतोब विचार करून आठवड्याची मजुरी तसेच दोन वळचे जेवण व नाष्टा अशी सोय करून द्यावी.

महापालिका प्रशासन नेमके काय करणार – .

शहरातील हवेच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हिवाळ्यात जमिनीवरील धुलिकण हवेत जाऊन हवा प्रदूषित होते. त्यात फटाक्यांची भर पडत आहे. त्यामुळे शहरातील हवा अतिवाईट श्रेणीत गेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील वायू प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने ३२ प्रभागांमध्ये १६ वायू प्रदूषण नियंत्रण पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकांद्वारे प्रभागातील बांधकाम स्थळांना भेटी देऊन छायाचित्रे, चित्रफितीद्वारे त्याची नोंद घेण्यात येत आहे. या दरम्यान प्रदूषण नियंत्रण तरतुदींचे पालन न केल्याचे उघड झाल्यास दंड आकारला जात आहे. दैनंदिन वायू प्रदूषण निरीक्षण केले जाते. शहरातील हवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी उद्योगांच्या वायू प्रदूषणावरही बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या (आयआयटीएम) सफर या संकेतस्थळाच्या माध्यमातून प्रदूषणाच्या नोंद घेतल्या आहेत. अतिसूक्ष्म धूलिकण (पीएम २.५) आणि सूक्ष्म धूलिकणात (पीएम १०) वाढ झाल्याने शहराच्या काही भागातील हवेची गुणवत्ता खराब श्रेणीपर्यंत पोहोचली होती. सफर या संकेतस्थळाच्या नोंदीनुसार भोसरी, वाकडमधील भूमकर चौक, निगडी या भागातील हवेची गुणवत्ता सर्वांत खराब श्रेणीत नोंदली गेली आहे. वाढलेल्या प्रदूषणामुळे शहरातील हवेची गुणवत्ता ढासळल्याने पर्यावरण विभागाने शहरातील सर्व बांधकामे आठ दिवस बंद ठेवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्याला आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली असून १९ नोव्हेंबर पर्यंत सर्व बांधकामे बंद राहणार आहेत.