बहिणाबाईंच्या पुण्यतिथीनिमित्त चुलीवर भाकरी करताना ऐतिहासिक कविसंमेलनशब्दधन काव्यमंचाचा उपक्रम

0
36

पिंपरी, दि. 03 (पीसीबी) : “आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर…” या निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेच्या सुंदर ओळी प्रत्यक्षात चुलीवर भाकरी करताना कविसंमेलन घेऊन शब्दधन काव्यमंच या साहित्य संस्थेने कृतीत आणल्या. महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र, उद्योगनगर, चिंचवड येथे संपन्न झालेल्या या कविसंमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी उज्ज्वला केळकर यांनी चुलीची यथोचित पूजा करून केले. कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी – चिंचवड शाखेच्या सदस्य जयश्री श्रीखंडे होत्या; तर प्रमुख पाहुण्या म्हणून प्रणाली प्रकाशनच्या शामला पंडित होत्या. महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र, उद्योगनगरचे केंद्रप्रमुख प्रदीप बोरसे, शब्दधन काव्यमंचाचे संस्थापक – अध्यक्ष सुरेश कंक यांची प्रमुख उपस्थिती होती. तानाजी एकोंडे यांनी चूल पेटवताना सादर केलेल्या भक्तिपूर्ण रचनेने कविसंमेलनाची सुरुवात झाली.

शब्दधन काव्यमंचाचे उपाध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, “बहिणाबाई चौधरी यांच्या ‘आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर’ या कवितेचा अर्थ असा आहे की, माणसाने आधी कष्ट केले पाहिजे मगच उत्तम फळ मिळते. हा बहिणाबाई चौधरी यांचा अनमोल संदेश सर्वांसाठी प्रेरणा देणारा आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त कष्टकरी कामगारांच्या या नगरीत यासाठी हे आगळेवेगळे कविसंमेलन घेत आहोत!”

“भाकरीच्या ताटामधे
बहिणाईचा शब्दघास
बहिणाईची चूल
माझ्या कवितेचा श्वास…”

या सुरेख कवितेचे सुरेल सादरीकरण करीत गजानन ऊफाडे यांनी कविसंमेलनाची रंगत वाढविली; तर अरुण कांबळे यांच्या “पाच लेकरांची माय, भाकर तव्यावर टाकते…” या कवितेने उपस्थितांना सद्गदित केले. राधाबाई वाघमारे, शोभा जोशी, आय. के. शेख, कैलास भैरट, फुलवती जगताप, जयश्री गुमास्ते, संगीता सलवाजी, नंदकुमार कांबळे, सुहास घुमरे, कांचन नेवे, केशर भुजबळ, अण्णा जोगदंड, हेमंत जोशी, तेजश्री पाटील, योगिता कोठेकर, डॉ. पी. एस. आगरवाल, सुहास सतर्के, संजना मगर, शारदा पानगे, सुभाष चटणे, यशवंत कण्हेरे, बळीराम शेवते, कल्याण पानगे, आनंद मुळूक, मयूरेश देशपांडे, संजय गमे, चंद्रकांत बरसावडे, महेश बिरदवडे यांच्यासह सुमारे पंचेचाळीस कवींनी आशयघन कवितांच्या माध्यमातून स्त्रीजाणिवा, मातृत्व, निसर्ग आणि सामाजिक बांधिलकी विशद केली. संध्या गांधलीकर यांनी बहिणाबाईं यांच्या ‘धरित्रीले दंडवत’ या कवितेचे अभिवाचन केले; तर नारायण कुंभार यांनी त्यांच्या सुप्रसिद्ध कवितांचे रसग्रहण केले. ह. भ. प. सुचेता गटणे यांनी सादर केलेल्या भारुडाने तसेच ह. भ. प. प्रकाश घोरपडे यांच्या भैरवीने कविसंमेलनाची सांगता करण्यात आली. मंगला पाटसकर केवळ कवितेच्या प्रेमापोटी व्हीलचेअरवरून कार्यक्रमस्थळी उपस्थित राहिल्या.

कार्यक्रमादरम्यान जागतिक एड्स प्रतिबंधक दिनाचे औचित्य साधून सुरेश कंक यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले; तसेच अभय पोकर्णा, मीना पोकर्णा, पंकज पाटील, संपत शिंदे, हरीश मोरे, भरत शिंदे, आनंद व्यंकरस यांना प्रातिनिधिक पत्रकांचे वाटप केले.
उज्ज्वला केळकर यांनी, “प्रपंच चालविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे काबाडकष्ट करावे लागतात. त्याचे प्रतीकात्मक वर्णन ‘अरे संसार संसार’ या कवितेतून आले आहे!”असे विचार मांडले. शामला पंडित यांनी भाकरी करीत आपल्या कवितेचे सादरीकरण केले. जयश्री श्रीखंडे यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “बहिणाबाई निरक्षर असल्यातरी अतिशय संवेदनशील अन् सर्जनशील मन त्यांना लाभले होते. त्यामुळे कमीतकमी शब्दांत मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान त्यांनी आपल्या कवितेतून मांडले!” असे मत व्यक्त केले.

मुरलीधर दळवी, अशोकमहाराज गोरे, अण्णा गुरव यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. शामराव सरकाळे यांनी आभार मानले