शरद पवार हे तसे अलौकीक व्यक्तीमत्व. काळाच्या पुढचे पाहणारे द्रष्टे. देशाच्या राजकीय पटलावरचे मुरब्बी, धुरंधर, दिग्गज. राजकारणाच्या पलिकडे उद्योग, व्यापार, शेती, शिक्षण, साहित्य, कला, क्रीडा, संस्कृती अशा सर्व क्षेत्रात मुशाफिरी करणारे बहुआयामी नेते. गाव खेड्यातील हरेक पुढाऱ्याचं नाव, नातंगोतं डोक्यात ठेवणारे कारभारी. वयाची ८० ओलांडली तरी पायाला भिंगरी लावल्यासारखे दौरे करणारे साहेब. आजही पुन्हा महाराष्ट्र पिंजून काढायची धमक ते बोलून दाखवणारे जिद्दी पुढारी. ६० वर्षांच्या राजकीय जीवनात अनेक संकटे आली गेली. खरे तर, आयुष्यभर त्यांनी संघर्ष केला, शेकडो आव्हाने पेलली. काटेवाडीतून सुरू झालेले हे तुफान. गेल्या आठवड्यात स्वकियांनीच वार केल्याने साहेब घायाळ झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळतात. तमाम पवार समरर्थकही गहिवरलेत. खरे म्हणजे सिंह म्हातारा झालाय हे मान्य केले पाहिजे. निसर्गाचा नियम आहे जेव्हा सिंहाचे दात पडतात, आयाळ झडते तेव्हा कोल्हे, कुत्रेसुध्दा त्याच्यावर गुरगुरतात. हा सर्व काळाचा महिमा. पवार साहेब हे तसे पूर्णतः नास्तिक, निधर्मी. नशिबावर ते कधीही विसंबलेले नाहीत. अखंड प्रयत्नवादी राहिले. थोडक्यात नियतीवर त्यांचा विश्वास नाही. पण एक सांगतो, नियती कोणालाही माफ करत नाही. कर्माचा हा सिध्दांत आहे. तुम्ही चांगली कर्म केलीत तर चांगलेच वाट्याला येते. गहू पेरला तर गहूच उगवतो. मात्र, तुम्ही धोत्र्याचे बी लावले तर धोत्राच उगवणार. पूर्वी तुम्ही जे पेरले तेच आज उगवले. आता पश्चाताप करून काहीच उपयोग नाही.
थोडेसे आरशात पाहिले तर समजेल…
एक लक्षात घ्या, पवार काका-पुतणे हे आजवर कधीही सत्तेशिवाय राहू शकलेले नाहीत. शरद पवार असो वा अजित पवार. कारण लोकांची कामे करायची, गावचा विकास करायचा असेल तर सत्तेची कास धरावीच लागते. पूर्वी शरद पवार यांनी तेच केले आणि आज अजित पवारसुध्दा तेच करतात. त्यात वेगळे असे काही नाही. अजितदादांनी हो नाही म्हणत, राष्ट्रवादीचाच बाडबिस्तरा घेतला आणि भाजपच्या बरोबर पाट लावला. आता दादांची आणि साहेबांची राष्ट्रवादी वेगवेगळी झाली. अगदी गावच्या भाषेत घर फुटले. काल दादा समर्थकांच्या सभेत छगन भुजबळ जे बोलले ते शरद पवार यांच्याही डोळ्यात अंजन घालणारे आहे. कारण, या फाटाफुटीत शरद पवार यांचे मानसपूत्र दिलीप वळसे यांनीसुध्दा दादांबरोबर जायचा निर्णय घेतला तेव्हा प्रतिभा पवार आणि खुद्द शरद पवार यांच्या डोळ्यात आश्रू तरळल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणालेत. त्यावर छगन भुजबळांनी आरसाच दाखवला. जेव्हा १९७८ मध्ये तेव्हाचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठित खंजीर खुपसण्याचा प्रयोग झाला तेव्हा ते सरकार कोसळले. शरद पवार यांनी पुलोदचे सरकार स्थापन केले. तेव्हा वसंतदादांनाही खूप वाईट वाटले. बाळासाहेब ठाकरे आणि मीनताई ठाकरे या भुजबळ यांच्यासाठी आई-वडिलांसमान होते. ३६ आमदारांसह शिवसेना सोडून भुजबळ शरद पवार यांच्या बरोबर गेले, त्याही वेळी शिवसेनाप्रमुखांच्या डोळ्यात आश्रू होते. त्यावेळी खरे तर, शिवसेना सोडू नकोस असे पवार साहेबांनी सांगायला पाहिजे होते. भाजपमधून धनंजय मुंडे यांना फोडून राष्ट्रवादीत आणले, तेव्हा गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे यांच्याही डोळ्यात पाणी होते. भुजबळ यांनी ज्या पध्दतीने आरसा दाखवला त्यामुळे शरद पवार यांची बोलतीच बंद झाली.
गुरूपौर्णिमेला गुरूची विद्या गुरूला …
अजितदादा पवार यांचे आजवरचे कर्तेधर्ते सर्व काही शरद पवार. चुलते-पुतणे याही पलिकडे गुरू-शिष्याचेही त्यांचे नाते. आमचा विठ्ठल साहेबच असल्याचे अजितदादांसह दिलीप वळसे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेलसुध्दा सांगतात. इतकेच नाही तर राष्ट्रवादीचे तमाम खासदार-आमदारसुध्दा साहेबांनाच गुरू मानतात. आपल्या गुरूजींच्याच राजकारणाचे धडे त्यांच्या चेल्याने गिरवलेत. दोन-चार दिवसांतील हा राजकीय तमाशा म्हणजे गुरूची विद्या गुरूला…
असे झाले. पूर्वी राजकारणाला एक नैतिकतेचे अधिष्ठान होते. शालिनतेची झालर होती. लोक गावच्या पुढाऱ्याला पालक समजतं. आमदार-खासदार यांनाही मान होता. कुठल्याही शुभकार्याच्या मुहूर्ताला त्यांची उपस्थिती हासुध्दा एक प्रतिष्ठेचा विषय होता. मात्र, जेव्हापासून फाटाफूट, खरेदी-विक्रीचे राजकारण सुरू केले तेव्हापासून लोक या राजकीय नेत्यांना दुगान्या झाडू लागले. एक ब्याद आली, असे संबोधू लागले. तत्व, न्याय, नितीचे राजकारण संपविण्यामध्ये शरद पवार यांचाही सिंहाचा वाटा आहे. ज्या शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीने यशवंतराव चव्हाण यांना गुरू मानले त्यांची ही असली शिकवण निश्चितच नाही.
… तर पवारांची औलाद नाही, ताई–दादाच्या भांडणात पक्ष फुटला
अजितदादांचा स्वभाव हा पोटात एक आणि ओठात दुसरे असा नाही. कालच्या भाषणात त्यांनी आपल्या काकांना विठ्ठल म्हणत म्हणत अक्षरशः मूर्तीभंजन केले. शरद पवार यांचे राजकारण कसे दुटप्पी, दुतोंडी आणि अनैतिक होते याचाच पर्दाफाश दादांनी केला. अक्षरशः साहेबांचेच वस्त्रहरण केले. तासाभराच्या भाषणात सगळी मळमळ बाहेर आली. खोटं बोललो, तर पवारांची औलाद सांगणार नाही, असे त्यांनी ठणकावले तेव्हाच हे प्रकरणे किती टोकाला पोहचले याचे दर्शन झाले. शरद पवार यांनी छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात सभा घेऊन काही टीका केली तर तिथेच सभा घेऊन जशास तसे उत्तर देणार, असा इशाराही दादांनी दिला. आजवर ज्या देवाची पूजा केली त्या विठ्ठलालाच थेट दम भरला. कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही, ही माझी चूक का ? असे जेव्हा अजितदादा म्हणतात तेव्हा लक्षात आले की हे घरचे भांडण आहे. कारण शरद पवार यांना राज्याची पहिला मुख्यमंत्री म्हणून कोणत्याही परिस्थितीत आपली कन्या सुप्रिया सुळेंनाच बसवायचे होते. अजितदादांना तेच खुपत होते. साहेबांचे आजवर सगळे डावपेच हे त्याच अंगाने होते. २००४ पासून राष्ट्रवादीला म्हणजेच अजितदादांना मुख्यमंत्री होण्याची संधी होती, पण उपमुख्यमंत्री पदाच्या पलिकडे त्यांना जाऊ दिलेच नाही. तब्बल पाच वेळा ते उपमुख्यमंत्री झाले. २०१९ मध्ये भाजप बरोबर पहाटेच्या शपथविधीत दादा बदनाम झाले, पण तिथेही साहेबांचेच राजकारण होते. भाजप बरोबर चार वेळा बैठका, चर्चा साहेबांच्या संमतीनेच झाल्या. तिथेही अजित दादा पुढे जाणार असे दिसताच फासे उलटे पडले. वारंवार आपल्याला डावलले जाते असे दिसल्याने, सहनशिलतेचा अंता झाला. अखेर साहेबांकडूनच बंडखोरीचे बाळकडू मिळालेल्या अजितदादांनी बंड केले. अजितदादा भाजपबरोबर जाणार याचा सुगावा लागल्यानेच शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन एक खेळी केली. तेव्हा अजितदादांचा रुद्रावतार आठवा. नंतर पुन्हा सुप्रियाला पक्षाचे कार्याध्यक्ष करून दादांना इशारा दिला. खरे तर, तोच एक प्रसंग हे निमित्त झाले आणि दादांनी फडणवीसांच्य मदतीने राष्ट्रवादीच हायजॅक केली. गेली चार वर्षे ठसठसणारे हे गळू अखेर फुटले.
वय झाले, विश्रांतीची गरज –
वय झाल्यावर माणूस हट्टी, दुराग्रही होतो हा निसर्गाचाच नियम आहे. अशा वेळी वानप्रस्थाश्रमाची गरज असते. शरद पवार यांनी आयुष्यभर खूप धावपळ केली. जिद्द, चिकाटी आणि दृढ आत्मविश्वास असल्याने वीस वर्षांपूर्वी अत्यंत दुर्धर आजारावर देखील त्यांनी लिलया मात केली. आज महाराष्ट्रात शरद पवार यांच्या तोडिचे दुसरे नेतृत्व नाही. खरे तर, माणसाने उंच शिखरावर असतानाच निवृत्ती स्वीकारली पाहिजे, त्यात मोठेपण असते. शरद पवार यांनी अलिकडे थोडाफार तो प्रयत्न केलासुध्दा. शेवटी वारस ठरवण्याच्या नादात कन्या की पुतण्या या घरच्या लढाईत त्यांना तशी माघारच घ्यावी लागली, त्यांची चाल फसली आहे. तुमचे वय झाले, तुम्ही थांबणार आहात की नाही ?
, असा रोकडा सवाल स्वतःचाच पुतण्या विचारतो, हे बरोबर वाटत नाही. आपण थांबले पाहिजे, नव्या पिढीकडे सूत्र दिली पाहिजेत, असे स्वतः साहेब भाषणात सांगतात आणि स्वतःवर ती वेळ आल्यावर हात आखडता घेतात. शिवसेना कधी जातीयवादी असते तर कधी सोयिची असते. स्वतः भाजपबरोबर सरकार स्थापनेची बोलणी करताना संघ किंवा मनुवादी विचारांनाच आपण लोटांगण घालतो, असे वाटत नाही. दुसरीकडे अजित पवार यांनीच ते धाडस केले तर ती गद्दीरी ठरते. गद्दारीचा परिपाठ कोणी कोणाला शिकवावा. किमान शरद पवार यांच्या तोंडी ती शोभत नाही. आयुष्यभर केवळ राजकीय स्वार्थासाठीच कित्येक खांदानी कुटुंबांत भांडणे लावून ती घरे फोडली. मुंडे, क्षिरसागरांसारखी शेकडो उदाहरणे देता येतील. आता तीच वेळ पवार स्वतःवर आल्यावर लोक म्हणू लागलेत, अहो हाच कर्माचा सिध्दांत आहे. पुढे मागे नाही, तर जिथे केले तिथेच म्हणजे याच जन्मात फेडावे लागते.