फौजदाराच्या लाचखोरीने पोलिस आयुक्त विनायक चोबे यांचे स्वागत

0
401

दोन लाखाची लाच मागणाऱ्या पिंपरी पोलिस ठाण्याच्या फौजदारावर गुन्हा दाखल

पिंपरी,दि. ३१ (पीसीबी) : पुणे एसीबीची (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) सूत्रे हाती घेतल्यापासून एसपी अमोल तांबे यांनी मोठे मासे गळाला लावण्याच्या कारवाईचा धडाका लावला आहे. त्यात त्यांनी आज दोन लाख रुपयांची लाच मागणाऱ्या पीएसआयविरुद्ध (फौजदार तथा पोलिस उपनिरीक्षक) लाचखोरीचा गुन्हा दाखल करून त्यात त्याला अटक केली.

या महिन्यात मुदतपूर्व तडकाफडकी बदली झालेले पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त (सीपी) अंकुश शिंदे यांच्या जागी आलेले विनयकुमार चौबे यांचे स्वागत त्यांच्या एका पोलिस अधिकाऱ्याच्या लाचखोरीतील अटकेने झाले आहे. नव्या आयुक्तांनी १४ तारखेला पदभार घेतल्यानंतर पंधरवड्यातच त्यांच्या एका पीएसआयविरुद्ध एसीबीची ही कारवाई झाली आहे.
रोहित गणेश डोळस (वय ४१) असे त्याचे नाव आहे. तो पिंपरी पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहे. तेथेच त्याच्याविरुद्ध लाचखोरीचा हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याने लाच मागितल्याच्या तक्रारीची २ डिसेंबरलाच एसीबीने पडताळणी केली होती. मात्र, त्यानंतर त्यांचा ट्रॅप यशस्वी झाला नाही. म्हणजे सुगावा लागला की काय डोळस याने लाचेसाठी तगादा लावला नाही..म्हणून महिनाभर वाट पाहून आज (ता.३०) एसीबीने त्याच्याविरुद्ध लाच मागितल्याबद्दल गुन्हा दाखल केला.

त्यांच्याकडील तक्रारदाराच्या भावाविरुद्ध पिंपरी पोलिस ठाण्यात एक तक्रार अर्ज आला होता. त्यात भावाला आरोपी न करण्यासाठी तसेच दिवाणी बाब म्हणून हे प्रकरण बंद करण्याकरिता डोळसने दोन लाख रुपये या तक्रारदाराकडे लाच मागितली होती. एसीबी पुणे रेंजचे एसपी तांबे, अॅडिशनल एसपी सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आल्याचे या युनिटचे डीवायएसपी (प्रशासन) श्रीहरी पाटील यांनी सांगितले. एसीबीचे पीआय भारत साळूंखे पुढील तपास करीत आहेत.