… फडणवीस जास्त बोलले तर उपमुख्यमंत्रीही राहणार नाहीत, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान

0
294

पंढरपूर, दि. २४ (पीसीबी) – महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार अनैतिक आहे. पक्ष तोड-फोड करून हे सरकार सत्तेत आलंय, असं वक्तव्य भाजपच्याच नेत्याने केल्याने महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. भाजपचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत. पंढरपूर कॉरिडोअरविरोधात त्यांनी राज्य शासनाच्या विरोधात भूमिका मांडली आहे.

माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘तोडके बनायी है…. निवडणूक लढवून नाही बनवली. आमदार फोडून सरकार बनवलं हे बरोबर नाही. हरयाणात एकदा शंभर टक्के इंदिरा काँग्रेस झाली होती. हा जोक मी पाहिला आहे. त्यावर लोक हसत होते. त्यामुळे इंदिरा गांधींची खूप बदनामी झाली होती. आता आमचीही बदनामी झाली आहे.

सरकार फोडून नवं सरकार बनवण्याची गरज नव्हती. विरोधात बसून आघाडीची पोलखोल करायची होती. ही खिचडी होती अधिक काळ चालली नसती… असं वक्तव्य सुब्रमण्यम स्वामी यांनी केलंय.

पंढरपूर कॉरिडॉविषयी त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ‘ पंढरपूरचे लोक मला मुंबईत येऊन भेटले होते. हा मोठा विषय आहे. कोर्टात सबडिसमिस झाला आहे. त्यानंतर मी त्यांच्याकडून कोर्टातील कागदपत्रं मागवली होती. यासंदर्भातली कागदपत्रं मी वाचली असून त्यावर चर्चा करण्यासाठी मी इथे आलो आहे.
पंढरपूर कोरिडोअरची गरज काय. इथे लोक वाहनांनी येत आहे. रस्ते खराब आहे. ते आधी करावं ना. पंढरपूर कॉरिडोअरची एवढी आवश्यकता का पडली. विमानतळ बनवा. लोक येतील. त्यामुळे व्यवसाय वाढेल. त्यानंतर लोकं स्वत: पंढरपूर चांगलं बनेल.

नव्या कॉरिडोअरसाठी मंदिरं तोडण्यात येणार आहेत. त्यासाठी लोकांना नोटिसा आल्या आहेत. हे सरकार चुकीचं करत आहे. कोर्टात हे टिकणार नाही, असा इशारा स्वामी यांनी दिलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपूर कॉरिडोअरसाठी आग्रही आहेत. कोणत्याही परिस्थितीत हा कॉरिडोअर होणारच अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. यावर सुब्रमण्यम स्वामी यांनी मोठं वक्तव्य केलंय. फडणवीस जास्त बोलले तर उपमुख्यमंत्रीही राहणार नाहीत, असा इशाराच त्यांनी दिलाय.