फडणवीसांच्या बॅनरवरून अमित शाह गायब

0
332

नागपूर दि. १ (पीसीबी)- एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री जाहीर करून देवेंद्र फडणवीसांनी केलेला त्याग संपूर्ण राज्यात चर्चेचा, तर भाजप कार्यकर्त्यांसाठी कौतुकाचा विषय आहे. त्यागमूर्ती फडणवीसांची सर्वत्र तारिफ होत असताना नागपुरातील त्यांचे खंदे समर्थक व माजी महापौर संदीप जोशी यांनी त्यांच्या स्वागतासाठी लावलेल्या बॅनरवर अमित शहा यांचे छायाचित्र नसल्याने चर्चेचा विषय झाला आहे.

संदीप जोशी माजी महापौर, सत्तापक्ष नेते तसेच स्थायी समिती अध्यक्ष होते. ते फडणवीसांचे खंदे समर्थक आहेत. पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीत काँग्रेसच्या अभिजित वंजारीकडून ते पराभूत झाले होते. तेव्हा त्यांचा गेम केल्याची चर्चा होती. तर आता अमित शहा यांनी फडणवीसांचा गेम केल्याची चर्चा आहे. संदीप जोशी यांनी लावलेल्या बॅनरवर “देवेंद्र तू कोणत्या मातीचा बनला आहेस?’ अशी भावनिक साद घालण्यात आली आहे. या बॅनरवर अमित शहा वगळून इतर सर्वांची छायाचित्र आहे…

देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार ही संपूर्ण महाराष्ट्राची भावना होती. एखाद्या सोबत संपूर्ण राज्य भावनिकदृष्ट्या जोडले जाण्याचे हे एकमेव उदाहरण असावे. रहस्य, रोमांच, थरार, नाट्य अशा साऱ्या गोष्टींनी ठासून भरलेले नाट्य या दहा दिवसांत घडले. एवढे सारे घडत असताना फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असे महाराष्ट्राने ठरवून टाकले होते. सारी सूत्रे हरवलेल्या माध्यमांनाही हेच वाटत होते. पण, 30 जूनला सायंकाळी दस्तुरखुद्द फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर केले. तेव्हा सारेच अवाक झाले. “ये बात कुछ हजम नही हुई’ अशीच साऱ्यांची प्रतिक्रिया होती.

यातील एकेक गोष्ट आता यथावकाश बाहेर येईल. त्यावर रवंथ होईल. पण, खरे काय ते फक्त फडणवीस, मोदी आणि शहाच सांगू शकतील. गृहमंत्री अमित शहा आणि फडणवीस यांच्यात सख्य नव्हते. फडणवीसांची शहांवर खफामर्जी झाली होती. त्यातूनच फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्यास तयार नसतानाही त्यांना भाग पाडले. यासाठी शहा जबाबदार असल्याची कुजबुज भाजपा कार्यकर्त्यांत आहे. फडणवीसांना उपमुख्यमंत्री करणे अनेकांना पटलेले नाही. पण, बोलायची कोणाची हिंमत नाही.

फडणवीसांच्या नावाला पक्षातंर्गत विरोध होता असे आता सांगितले जात आहे. पण, “आपण सरकारमध्ये सहभागी होणार नाही’, असे बाणेदारपणे जाहीर केल्याच्या काही तासातच पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा त्यांना जाहीर आदेश देतात आणि अमित शहा ट्विट करून आदेशाचे पालन करण्यास सांगतात, हे भाजपा कार्यकर्त्यांकरीता अनाकलनीय आहे. फडणवीसांनी हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी वरिष्ठांशी चर्चा केली नव्हती काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.