प्रकृती स्वास्थ ठिक नसूनही आमदार जगताप आणि टिळक विधानपरिषदेसाठी मतदान करणार ?

0
396

मुंबई, दि. १८ (पीसीबी) : प्रकृती स्वास्थ ठिक नसल्याने डॉक्टरांकडे उपचार घेत असलेले चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि पुण्याच्या आमदार मुक्ता टिळक हे भाजपाचा पक्षादेश पाळत पुन्हा एकदा मुंबईला जाणार आहेत. २० जुन रोजी विधान परिषद निवडणुकीत दोघेही मतदान करण्यासाठी विधान भवनामध्ये उपस्थित राहणार आहेत. डॉक्टरच्या सल्लाने या दोन्ही आमदारांनी मतदानादिवशी योग्य ती काळजी घेऊन आजारपणातही मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. एकिकडे मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे जेलमध्ये असून त्यांना उच्च न्यायालयाने मतदानासाठी परवानगी नाकारल्याने महाआघाडीत चिंतेचा सूर आहे, तर दुसरीकडे आमदार जगताप आणि टिळक कोणत्याही परिस्थितीत पुन्हा मतदानासाठी येणार असल्याचे समजल्याने भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

आमदार जगताप आणि टिळक यांनी नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीतही मतदान केले होते. त्यावेळी जोखीम पत्कारून मतदानासाठी आलेल्या आमदार जगताप यांना भाजप नेत्यांनी दारात येऊन ‘सॅल्यूट’ केला होता. नेत्यांचे पक्षाचे प्रेम पाहून भरावलेल्या जगताप यांनीही आभार मानले होते. हॉस्पिटलमधील उपचारानंतर काही दिवसांपूर्वी घरी आलेल्या जगताप यांना सध्या प्रवास काय, तर साधे कोणाला भेटू दिले जात नाही. तरीही, पक्षाचा आदेश पाळायचा म्हणून जगताप यांनी मतदानासाठी जाण्याचा आग्रह धरला होता. त्यामुळे त्यावेळी कार्डेक अॅम्ब्युलन्सच्या सहाय्याने आमदार जगताप यांना मुंबईला नेण्यात आले होते.

भाजपच्या आमदार मुक्ता टिळक या आजारपणात बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना देखील अॅम्बुलन्सतमधून विधानभवनात मतदानासाठी गेल्या होत्या. त्यांनी पीपीई कीट, मास्क घालून सुरक्षिततेच्या थेट स्ट्रेचरवरून जात मतदान केले. टिळक यांची धडाडी पाहून पक्षाच्या नेत्यांनी दाद दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा केवळ पक्षादेश पाळायचा म्हणून हे दोन्ही आमदार मतदानासाठी मुंबईत येणार आहेत.

विधान परिषद निवडणुकीत सध्या विजयी मतांच्या कोटा २६ वर आला आहे. महाविकास आघाडीच्या सध्याच्या संख्याबळानुसार त्यांचे सहा, यात शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि अपक्ष-छोट्या पक्षांच्या आमदारांच्या सहाय्याने काँग्रेसचे २ आमदार निवडून येवू शकतात. याशिवाय संख्याबळानुसार भाजपचे ४ आमदार निवडून येवू शकतात. मात्र भाजपने ५ उमेदवार दिल्याने त्यांना पाचवा उमेदवार जिंकण्यासाठी अतिरिक्त २२ मतांची गरज भासणार आहे. त्यामुळे प्रत्येक मत महत्वाचे बनले आहे.