रावेत ,दि. ४ (पीसीबी) -पती पत्नी रस्त्यात गोंधळ घालत असल्याने त्यांना समज देण्यासाठी पोलीस ठाण्यात आणले असता महिलेने पोलिसांशी हुज्जत घालून एका पोलीस महिलेच्या हाताला चावा घेत दुखापत केली. ही घटना रविवारी (दि. 2) रात्री रावेत पोलीस ठाण्यात घडली.
याप्रकरणी 26 वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिला पोलीस पौर्णिमा चव्हाण यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रावेत पोलीस ठाण्यात रविवारी रात्री कर्तव्यावर असताना त्यांना डायल 112 वर एक कॉल आला. जय गणेश लॉन जवळ नवरा बायको भांडत असून त्यांचा आजूबाजूच्या लोकांना त्रास होता. त्यानुसार फिर्यादी आणि पोलीस अंमलदार जय गणेश लॉन येथे गेले. त्यानंतर महिलेला समज देण्यासाठी रावेत पोलीस ठाण्यात आणले. त्यावेळी महिलेने पोलीस ठाण्यात पोलिसांसोबत हुज्जत घातली. फिर्यादीची वर्दीची कॉलर पकडून त्यांच्या उजव्या हाताला चावा घेऊन त्यांना जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.