पैसे परत मागितल्याने एकावर खूनी हल्ला

0
768

पिंपरी, दि. ८ (पीसीबी)- पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या चार जणांवर चॉपर व चाकूने वार केले. तसेच एकावर खूनी हल्ला केला. ही घटना रविवारी (दि. 6) रात्री आठ वाजताच्या सुमारास आळंदी जवळील काळे कॉलनी येथे घडली. वसीम हुसेन शेख (वय 27, रा. चऱ्होली) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नवाज सय्यद, राहूल सुरेश चोरडिया (वय 44 दोघेही रा. काळे कॉलनी, आळंदी देवाची), महिला आरोपी व त्यांचा साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा मित्र शशिकांत गायकवाड यांच्याकडून आरोपी राहूल चोरडिया याला जुन्या व्यवहाराचे पैसे देणे होते. ते पैसे त्याने ऑनलाइन पाठविले. मात्र नजरचुकीने जादा पैसे गेले होते. जादा गेलेले पैसे परत मागण्यासाठी फिर्यादी, शशिकांत गायकवाड, त्याचा भाऊ व खंडू लोणकर हे आरोपी राहूल याच्याकडे गेले. आरोपीने शिवीगाळ करीत पैसे परत देण्यास नकार दिला. तसेच फिर्यादी वसीम यांच्या पाठीवर चाकूने वार केले. आरोपी नवाज सय्यद याने फिर्यादी यांच्या छातीवर चॉपरने वार केले. तसेच चॉपर पोटात घुसवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपी नवाज याने शशिकांत गायकवाड व खंडू लोणकर यांच्यावरही चॉपरने वार केले. आरोपी राहूल याने गायकवाड यांच्या भावाच्या छाती व पोटावर चाकूने वार केले. आरोपी नवाज याच्या पत्नीने शिवीगाळ करीत फिर्यादी व त्यांच्या सोबत असलेल्यांना दगड फेकून मारून जमखी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.