पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

0
488

बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई रविवारी (दि. 28) रात्री पावणेदहा वाजताच्या सुमारास मरकळ गाव येथे करण्यात आली.

अर्जुन भाऊराव सूर्यवंशी (वय 20, रा. आळंदी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यासह अंकित मस्के (रा. चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सुमित देवकर यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मरकळ गावातील माऊली हार्डवेअर दुकानाच्या शेजारी एक तरुण संशयितपणे थांबला असून त्याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती दरोडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून अर्जुन सूर्यवंशी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 80 हजार रुपये किमतीचे दोन पिस्टल आणि दोन हजार रुपये किमतीचे दोन जिवंत काडतुसे जप्त केली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.