पिंपरी महापालिकेतील लाचखोर सर्वेअरचे निलंबन

0
310

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) : लाच घेताना पकडले जाऊनही सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध अनेकदा निलंबनाची कारवाई तांत्रिक मुद्याच्या आधारे लगेचच केली जात नाही. जरी, ती केली गेली, तरी सबंधित लाचखोरांना सहा महिन्यांनंतर पुन्हा सेवेत घेतले जाते. मात्र, लाच मागितली म्हणून पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ३ तारखेला अटक केलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सर्व्हेअर संदीप फकीरा लबडे (वय ४८) यांना महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी, मात्र निलंबनाचा दणका दिला. तसेच त्यांची खातेनिहाय चौकशीही लावली आहे. आयुक्तांनी लबडेंना निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी सुरु करण्याचा आदेश काल काढला. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यातच (ता.१८) तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष तथा सभापती, त्यांचे पीए आणि स्थायीतील दोन क्लार्क आणि एक शिपाई असे पाचजण एक लाख १८ हजार रुपये लाच घेताना (स्थायीतील टक्केवारी) पकडले गेले होते. पालिकेच्या एका शीख तरुण ठेकेदारामुळे स्थायीची ही टक्केवारी उघडकीस आली होती. त्यातील तत्कालीन सत्ताधारी भाजपच्या स्थायी समिती अध्यक्षांवर, मात्र अद्यापपर्यंत कसलीच कारवाई पक्षाकडून झाली नाही. उलट तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांनी आपला उर्वरित कार्यकाळही पूर्ण केला होता.

एका तरुणामुळे पालिकेतील हा ताजा भ्रष्टाचार समोर आला. त्याच्या कंपनीला विकास योजना अभिप्राय देण्यासाठी नगरविकास विभागातील लबडेंनी ही लाच मागितली होती. त्यात त्यांना ३ तारखेला अटक होऊन ५ तारखेपर्यंत एसीबीची कोठडी मिळाली. ४८ तासांपेक्षा अधिक काळ कोठडीत राहिल्याचा एसीबीचा अहवाल येताच आयुक्तांनी लबडेंना थेट घरीच बसवले. लबडेंच्या या कृत्यामुळे पालिकेची प्रतिमा जनमानसात मलिन झाली. त्यांचे हे गुन्हेगारी स्वरुपाचे वर्तन पालिकेच्या दृष्टीने अशोभनीय असल्याचे त्यांच्या निलंबन आदेशात म्हटले आहे.