पिंपरी महापालिकासुध्दा ईडी च्या रडारवर

0
218

मुंबई, दि. २४ (पीसीबी) : मुंबई महापालिकेपाठोपाठ पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकाही ईडीच्या रडारवर आल्या आहेत. ईडीने या दोन्ही महापालिकांकडून काही महत्त्वाची माहिती मागवल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना काळातील कंत्राटासंदर्भात संशय आल्याने ईडीने दोन्ही महापालिकांना नोटीसा बजावल्या आहेत.

कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीने मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना समन्स बजावले होते. ईडीने इक्बाल सिंह चहल यांची एक तासांहून अधिक वेळ चौकशी केली होती. त्यानंतर आता पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकाही ईडीच्या रडारवर आल्या आहेत.कोरोना काळात शहरातील जम्बो कोविड सेंटर चालविण्यासाठी महापालिकांनी दिलेल्या कंत्राटाची माहिती ईडीने मागवली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई पालिकेच्या कोविड सेंटरबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केल्यानंतर ईडीने मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांना समन्स बजावले होते. त्यानंतर आता पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांकडूनही माहिती मागवण्यात आली आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबई महापालिकेनंतर किरीट सोमय्या यांनी पुणे आणि पिपंरी-चिंचवड महापालिका कोविड सेंटरमध्येही झालेल्या गैरव्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली होती. या तक्रारीनंतर महापालिका अॅक्शन मोडवर आली असून या प्रकरणी ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे.

जम्बो कोविड सेंटर प्रकरणी एका चहा वाल्याच्या नावाने कंत्राट घेतल्याचा किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता. पुण्यात रॅपिड अँटिजन किटच्या माध्यमातून खोटे रेकॉर्ड तयार केल्याच्या आरोप झाल्यानंतर पुणे महापालिकेकडून चौकशी कऱण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाची आता ईडीनेही दखल घेतली आहे.