पिंपरी-चिंचवड, पनवेल शहर हेच बारणेंच्या यशाचे गमक- थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
620

राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांच्या अनेक समर्थकांनी विरोधात काम केले तसेच भाजपमधील एका गटाने तटस्थ राहून विरोधात भूमिका घेतल्याने खासदार श्रीरंग बारणे यांचे मताधिक्य यावेळी चांगलेच घसरले. २०१४ मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासारख्या ताकदिच्या नेत्याचा बारणे यांनी पहिल्याच झटक्यात तब्बल दीड लाखाने पराभव केला होता. दुसऱ्यांदा २०१९ मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लाडके चिरंजीव पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून समोर असल्याने बारणे यांचा निभाव लागणार नाही, अशी अटकळ होती. प्रत्यक्षात पहिल्यापेक्षा अधिक म्हणजे तब्बल २ लाख १५ हजार मतांनी खासदार बारणे यांनी मैदान मारले आणि आश्चर्याचा धक्का दिला. दोन्ही निवडणुकित भाजप-शिवसेना युतीची साथ आणि मोदींची जादू होती. यावेळी ठाकरेंची शिवसेना फाटाफुटीच्या राजकारणामुळे शिंदे गटाचे उमेदवार असल्याने बारणे यांच्या विरोधात सूड भावनेने पेटून उठली होती. मात्र, दुसरीकडे भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची पारंपरीक मतांची गोळाबेरीज केली तर मताधिक्य वाढेल, अशी साधारण अपेक्षा होती. आता मोदींची जादू ओसरली, ठाकरेंच्या शिवसेनेची गठ्ठा मते विरोधात होती, बऱ्याच अंशी खासदार बारणे यांच्याबद्दलची नाराजी साचली होती तसेच अजितदादांच्या राष्ट्रवादीने उघडपणे विरोधी उमेदवार संजोग वाघेरे यांची पालखी खांद्यावर घेतली होती म्हणून अपेक्षेपेप्रमाणे मताधिक्य वाढले नाही.

बारणे यांच्या यशात भाजपचा मोठा वाटा
खासदार श्रीरंग बारणे ज्या शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार होते त्या पक्षाची ताकद संपूर्ण मतदारसंघात तोळामासा होती भाजपच्या पठडितील शहरी मतदारालाच याचे श्रेय जाते. एकूण मतदानातील मतांचे तालुकानिहाय आकडे तेच बोलतात. खासदार श्रीरंग बारणे यांना ६,९२,८३२ म्हणजे एकून मतांच्या ४८.८% मते मिळालीत. त्यांचे प्रतिस्पर्धी संजोग वाघेरे पाटील यांना ५,९६,२१७ म्हणजेच ४२% मते मिळाली. बारणे यांचे मताधिक्य ९६ हजार ६१५ मतांचे आहे. साधारणतः २५ लाख मतदारांपैकी १३ लाख म्हणजे ५२ टक्के मतदारांनी मतदान केले होते. त्यात दोघांच्याच मताची विभागणी दिसून येते, अन्य उमेदवारांना मिळालेली मते अत्यंत फूटकळ आहेत. खरे तर, शहरी मतदारांमुळेच बारणे जिंकले, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये. मावळ लोकसभेत पिंपरी, चिंचवड आणि पनवेल या शहरी मतदारांनीच चमत्कार दाखवला म्हणून बारणे यांची नय्या किनाऱ्याला लागली अन्यथा मध्येच बुडाली असती. चिंचवड – ७४, ७६५, पिंपरी – १६,७६१ आणि पनवेल – ३१,०३८ हे खासदार बारणे यांचे मताधिक्य बोलके आहे. म्हणजे तब्बल १,२२,५६४ चे मताधिक्य शहरी मतदारांनी दिले. अगदी स्पष्टच बोलायचे तर, पिंपरी आणि चिंचवड शहरानेचे बारणे यांचा विजय सूकर केला. भाजपच्या निष्ठावंतांनीच काम केले मात्र, राष्ट्रवादीच्या निष्ठावंतांनी काम दाखवले याचा हा ढळढळीत पुरावा आहे. मावळ तालुक्यात माजी मंत्री बाळा भेगडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल शेळके यांची भूमिका पहिल्यापासून अगदी तटस्थतेची होती म्हणून मावळातून अवघे ४,०९५ चे मताधिक्य बारणे यांच्या पदरात पडले.

पनवेल वगळता घाटाखाली ठाकरेंची शिवसेनाच…
कोकणात शिवसेनाच चालते. २००९ पासूनच्या सर्व निवडणुकांचे आकडे पाहिले तर तेच चित्र आहे. त्यातच दोन वेळा उध्दव ठाकरेंचे खासदार असलेले बारणे शिंदेंसोबत गेल्याचा राग मतपेटीत प्रगटला. ग्रामिण भागात ठाकरेंच्या शिवसेनेचे वर्चस्व आजही कायम असल्याने कर्जत, उरण या तालुक्यांतून संजोग वाघेरे यांची आघाडी आहे. तिथे म्हणजे उरण मध्ये १३,२५० तर कर्जतमधून १७,६६० मतांची आघाडी वाघेरे पाटील यांनी घेतली. महाआघाडीचा घटक पक्ष म्हणून शेकापची लाख भर मतांची ताकद संजोग वाघेरे यांच्या मागे ठामपणे उभी राहिली म्हणून उरण वाघेरेंची आघाडी आहे. कर्जत हा तालुका अगदी सुरवातीपासुन ठाकरेंच्या प्रेमात असल्याने तिथेही वाघेरेंना मताधिक्य मिळाले आणि बारणे यांचा कपाळमोक्षल झाला.

वाघेरेंचे काय चुकले –
खासदार बारणे यांनी महापालिकेच्या चार, विधानसभेची एक आणि लोकसभेच्या दोन निवडणुकांचा अनुभव कामी आला. आपल्या विरोधात काम करणाऱ्या तमाम नेते, कार्यकर्त्यांची जंत्री त्यांच्याकडे होती पण त्यांनी ते कधी मतदानापर्यंत उघड केले नाही. गावकी भावकी ज्याच्या बाजुने झुकते त्याचेच पारडे जड असते हे आजवरचे परंपरागत समिकरणही बारणे यांनी न बोलता मोडित काढले. तमाम गावकी आणि भावकी यावेळी वाघेरे यांच्या बरोबर होती पण त्याचा उपयोग झाला नाही म्हणा की त्यांचा प्रभाव ओसरला आहे. २०१४ मध्ये लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात म्हणून आणि २०१९ मध्ये पार्थ पवार यांची गुलामी नको म्हणून सर्व गावकी भावकी बारणे यांच्या मागे उभी होती. यावेळी पाव्हणा बदला असा संदेश सोयऱ्यांमध्ये पोहचला होता. बारणे अहंकारी आहेत, कोणाला ओळख देत नाहीत, कोणाच्या कार्याला येत नाहीत असे कारण देत गावकी नाराज होती. निवडणुकीत त्यासाठीच आता पाव्हणा बदला असा संदेश होता. दुसरीकडे संजोग वाघेरेंनी फक्त गावकी भावकीला कवटाळून पायावर धोंडा मारून घेतला. बारणे यांच्या विरोधातील नाराजी मोठी होती, पण वाघेरे यांना ती मतपेटीपर्यंत पोहचवता आली नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार म्हणून महापालिकेतील स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचारासह अनेक कामांचे वाभाडे काढणे शक्य होते. आळीमिळी गुपचिळी करत संजोग वाघेरे यांनी तिथे कच खाल्ली. मितभाषी पाटील हे जुन्या गावच्या पाटिलकीत गुरफटले आणि फसले. शेवटच्या टप्प्यात जी रसद पाहिजे ती मिळाली नाही म्हणून सर्व यंत्रण ठप्प झाली होती. मतदारसंघाचा आकार, आवाका पाहून हा आपला घास नाही हे लक्षात आल्याने वाघेरे यांनीही हातपाय गाळून एकप्रकारे निवडणूक सोडून दिली होती. मतदानाच्या दिवशी महाआघाडीच्या कार्यकर्ते चहा वडापावलासुध्दा महाग होते इतकी दुर्दशा झाली. खरे तर, अशक्य ते सहज शक्य होते पण संजोग वाघेरे पाटील यांना शेवटपर्यंत ती भट्टी जमलीच नाही.

भाऊसाहेब भोईर किंवा राहुल कलाटे असते तर…
मावळ लोकसभेला शिवसेना ठाकरे गटाला तगडा उमेदवार मिळालाच नाही, ही शोकांतिका आहे. वाघेरे यांच्यापूर्वी जेष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांना शिवसेनेने विचारणा केली होती, पण ते अखिल भारतीय नाट्य संमेलनात बिझी होते. दुसरा पर्याय म्हणून ज्यांनी चिंचवड विधानसभेला सर्व पक्षांचे उमेदवार म्हणून तब्बल १ लाख ११ हजार मते घेतली त्या राहुल कलाटे यांच्यासाठीही शिवसेना नेते आग्रही होती. कलाटे यांनी नकार दिल्याने त्यांची संधी गेली. अखेर दुधाची तहान ताकावर भागवायची म्हणून संजोग वाघेरे यांना एकनाथ पवार यांनी मातोश्रीचा रस्ता दाखवला आणि त्यांनाच बाशिंग बांधले. जर वाघेरे यांच्या एवजी भोईर किंवा कलाटे हे उमेदवार असते तर कदाचित आजचे चित्र वेगळे असते. भोईर आणि श्रीरंग बारणे हे दोघेही प्रा. रामकृष्ण मोरे सर यांच्या एकाच तालमितले पठ्ठे. अगदी लहानपनापासूनचे दोघेही लंगोटी यार. दोघांना एकमेकांची बलस्थाने आणि कच्चे दुवे माहित होते. कलाटे हे सुध्दा दहा-बारा वर्षे शिवसेनेत मुरलेले आणि एक आक्रमक चेहरा म्हणून ओळख होती. लक्ष्मण जगताप आणि बारणे या दोघांची खडानखडा माहिती असलेले मुरब्बी नेते. उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या गळ्यातील ताईत. दोघांपैकी एक जरी उमेदवार बारणे यांच्या विरोधात मैदानात असता तर लढत रंगतदार झाली असती आणि प्रसंगी चित्र वेगळेच दिसले असते. दुर्दैव असे की भोईर आणि कलाटे हे दोघेही बस गेल्यावर बसस्थानकावर येतात. नशिबाने यापूर्वीही शिवसेनेचे गजानन बाबर हे असेच दोनवेळा आमदार आणि एकदा खासदार झाले होते. आता श्रीरंग बारणे यांचे नशिब बलवत्तर, बाकी काही नाही.