पिंपरीतील न्यायालयात भीमजयंती उत्साहात साजरी

0
197

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड ऍडव्होकेट्स बार असोसिएशनतर्फे पिंपरीतील मोरवाडी न्यायालय येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती शुक्रवारी 14 एप्रिलला उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी कोर्ट न्यायाधीश एन. आर. गजभिये साहेब तर प्रमुख पाहुणे म्हणून एम. आय. डी. सी. भोसरी पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर राजेंद्र निकाळजे हे होते.

पिंपरी बारच्या महिला सचिव ऍड. प्रमिला गाडे यांनी सर्व पाहुण्यांना व वक्त्यांना बाबासाहेबांची दोन महत्वाची पुस्तके (लोकशाहीला असलेला धोका व भारतातील जाती) भेट दिली.

कार्यक्रमाचे संयोजन पिंपरी चिंचवड ऍडव्होकेट्स बार असोसिशन यांनी केले. बारचे अध्यक्ष ऍड. नारायण रसाळ, उपाध्यक्ष ऍड. जयश्री कुटे, सचिव ऍड. गणेश शिंदे, ऍड. रमेश महाजन यांनी केले. महिला सचिव ऍड. प्रमिला गाडे यांनी सूत्रसंचालन केले तर ऍड. नितीन कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले. असंख्य वकील व इतर नागरिक यावेळी उपस्थित होते.

पहिले व्याख्यान ऍड. राजेंद्र अनभुले यांचे झाले. त्यांनी सांगितले की डॉ. बाबासाहेब अत्यंत गरिबीतून वर आले व त्यांच्या पत्नीने ही त्यांना साथ दिली. कार्ल मार्क्सचे तत्वज्ञान भारतीय परीप्रेक्ष्यात कुठे कमी पडतेय हे शोधून त्याला बुद्धाच्या तत्वज्ञानाची जोड देऊन परिपूर्ण करण्याचे काम बाबासाहेबांनी केले. भांडवलदारांची हुकूमशाही मोडून काढून त्याऐवजी कामगारांच्या हिताची धोरणे असावीत यासाठी त्यांनी शांततेच्या मार्गाचा आग्रह धरला. घटनेतील तिसऱ्या भागातील मार्गदर्शक तत्वे प्रत्यक्ष कायद्यात त्यांना हवी होती परंतु तसे झाले नाही त्यामुळे त्यांच्या अंमलबजावणीसाठी कोर्टातही जाता येत नाही असे ऍड. अनभुले म्हणाले.

दुसरे व्याख्यान ऍड. सचिन गोडांबे यांचे झाले. त्यांनी सांगितले की रमाई सारखीच साथ सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुलेना तर लक्ष्मीबाई यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांना दिली. महात्मा फुलेंनी त्या काळात मोफत व सक्तीच्या सरकारी शिक्षणाचा आग्रह धरला होता परंतु भरमसाठ कर भरून आजही आपल्याला केजी ते पीजी शिक्षण सरकारी, मोफत व दर्जेदार शाळांतून मिळत नाही. बाबासाहेबांनी आपल्याला शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा संदेश दिला परंतु आपण शिकून संघटित झालेलो नाहीत व या व्यवस्थेविरुद्ध संघर्ष तर खूपच कमी जण करत आहेत. शिवाजी फुले शाहू आंबेडकर यांनी कधी कोणत्या जातीचा द्वेष केला नाही. मनुस्मृती जाळताना ही काही ब्राह्मण बाबासाहेबांच्या सोबत होते व त्यांनी दुसरे लग्न हे एका ब्राह्मण महिलेसोबत केले. शिवाजी राजांनी ही दुसऱ्या शाक्तपंथीय राज्याभिषेकावेळी 24 सप्टेंबर 1674 ला एका अस्पृश्य स्त्री शी शैवविवाह करून आंतरजातीय विवाह करणारे जगातील पहिले राजे ठरले. आपल्या हयातीत एक घटना (मनुस्मृती) जाळणारे व दुसरी घटना (संविधान) निर्माण करणारे बाबासाहेब खरे समाज क्रांतीकारक होते. परंतु गेली काही वर्षे आधार सारख्या संविधान विरोधी योजना राबवून संविधानातील विविध तरतुदी मोडीत काढण्याचे काम सुरु आहे असे सचिन गोडांबे यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की खासगीकरण हे संविधान विरोधी व आरक्षण व्यवस्था संपविणारे धोरण आहे त्यामुळे सर्वांनी त्याचा विरोध केला पाहिजे. गुलामाला तो गुलाम असल्याची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल असा मोठा संदेश बाबासाहेबानी आपल्याला दिला परंतु सध्याची शिक्षण व्यवस्था मानसिक गुलामांची फौज तयार करत आहे, वैज्ञानिक दृष्टीकोन न शिकवता व चांगला माणूस घडविण्याचे शिक्षण न देता मनुवादी शिक्षण दिले जात आहे त्यामुळे आपल्या मुलांना सरकारी किंवा रयत शिक्षण संस्थेत शिकवून 10 वी, 12 वी नंतर त्यांना जर्मनी किंवा लंडनला पाठवा असेही यांनी यावेळी सांगितले.

पुढे सचिन गोडांबे यांनी हेही सांगितले की बाबासाहेब मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर छत्रपती शाहू महाराज मुंबईतील चाळीत त्यांना शोधत गेले होते. अस्सल हिऱ्याची पारख करण्याची अचूक क्षमता त्यांच्याकडे होती. आपला ताफा मुद्दाम गंगाराम कांबळेच्या हॉटेल वर थांबवून शाहू महाराज तिथेच चहा प्यायचे. आपल्या नात्यातील मुलीचे लग्न त्यांनी धनगर मुलाशी लावून आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले. छत्रपती शाहू महाराज व बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराज या दोन राजांनी बाबासाहेबांना उच्च शिक्षणासाठी लंडन व अमेरिकेत पाठवले. बाबासाहेबांचा पुतळा अमेरिकेत कोलंबिया युनिव्हर्सिटी इथे आहे असं त्यांनी सांगितले.