पालकमंत्री अजितदादा आता काकांच्या गणिमी काव्याला पुरून उरणार का? -थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
428

अखेर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणजेच कारभारी पद अजितदादा पवार यांच्याकडेच आले. पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवड शहराचे राजकारण ताब्यात ठेवायचे तर पालकमंत्रीपद हातात असणे गरजेचे होते. दादा त्यासाठीच अडून बसले होते, दोन-तीन दिवस नाराज होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नकार होता, पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन पावले माघार घेत तडजोड केली आणि दादांचा हट्ट पुरवला. खरे तर, आगामी संपूर्ण वर्ष निवडणुकिचे आहे. लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकांमध्ये पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण करायचे तर पालकमंत्रीपद पाहिजेच. २०१७ मध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड अशा दोन्ही महापालिकांतून राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपने सत्तेबाहेर खदेडले. २१ विधानसभा मतदारसंघापैकी दादांच्या राष्ट्रवादीकडे ९ आमदार आहेत, पण भाजपकडेही तिंतकेच संख्याबळ आहे. अर्ध्यावर नगरपालिका भाजपकडे गेल्यात आणि आगामी काळात जिल्हा परिषदसध्दा हातातून जाऊ शकते याची दादांना भिती होती. जिल्ह्यातील दूध संघ, जिल्हा बँक, साखर कारखाने, खरेदी-विक्री संघ, हवेलीसह सर्व बाजार समित्या दादांकडे आहेत. भाजपने या संस्थासुध्दा हातात घ्यायची व्यहरचना तयार ठेवली आहे. त्यातच दादांचे काका म्हणजे राज्याच्या राजकारणातील भीष्म पितामह असलेले शरद पवार. दादांचे बंड मोडीत काढण्यासाठी काका पायाला भिंगरी लावल्यासारखे गावोगावी फिरत आहेत. जुनेजाणते नेते आणि आजवरच्या कामामुळे सामान्य जनता, शेतकरीसुध्दा साहेबांकडे झुकला आहे. निवडणुकित हीच हवा कायम अशीच राहिली तर आगामी काळात दादांच्या राजकारणालाच सुरूंग लागू शकतो. मागे मावळ लकसभा मतदारसंघातून दादांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या उमेदवारीला शरद पवार यांचा उघडपणे नकार असताना सुनेत्रा पवार यांच्या आग्रहाखातर उमेदवारी दिली होती. व्हायचे तेच झाले, पार्थ हे दादांचे चिरंजीव असूनही अत्यंत दारूण पराभव झाला. पवार घराण्याला पराभव माहित नव्हता, पण मावळ लकसभेला शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी कोण पार्थ पवार ? म्हणत पवार घारण्याचे कुलदीपक अर्थात लाडके चिरंजीव पार्थदादांना म्हणजेच एकप्रकारे अजितदादांनाच आस्मान दाखवले. तो परभाव दादांच्या जिव्हारी लागला आणि ती जखम अजून ओली आहे. पार्थ पवार यांच्या पाठोपाठ आता दुसरे चिरंजीव जय पवार हेसुध्दा मधून मधून दादांच्या बरोबर कार्यक्रमात हजेरी लावतात कारण आगामी काळात त्यांचेही लॉन्चिंग करण्याचे दादांच्या मनात आहे. हे सगळे करायचे निर्विवाद सत्ता, अधिकार सर्व हातात पाहिजे. पालकमंत्रीपद त्यासाठीच हवे होते आणि ते आता मिळालेय. त्यामुळे दादांचे समर्थक आमदार आणि सर्व कार्यकर्ते खुश आहेत.

मुळात अजित पवार यांचा स्वभाव अत्यंत स्वाभिमानी, हट्टी, दुराग्रही आहे. भाजपने त्यांना गरज नसतानाही ईडी चा धाक दाखवत आपल्या कळपात ओढून नेले. दादांना सांभाळायचे नाजूक काम अमितभाई शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविली. कारण आगामी राजकीय समिकरणे आहेत. पश्चिम महाराष्ट्रात पवारांचे वर्चस्व आहे. पूर्वी भाजपचे कुसळसुउध्दा या रानात उगवत नव्हते. शिवसेनेची शिडी करून भाजपने २५-३० वर्षांत महाराष्ट्र काबिज केला. गरज संपली म्हणून शिडी फेकून दिली. साडेतीन जिल्ह्याचे पंतप्रधान म्हणत शरद पवार यांना हिनवणाऱ्या भाजपला पश्चिम महाराष्ट्रात अजूनही भक्कमपणे पाय रोवता आलेले नाहीत. आता अजितदादांची शिडी वापरून भाजपला साखर पट्टा म्हणजे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरवर कायमचे वर्चस्व ठेवायचे आहे. थोरल्या साहेबांना आजवर दुसऱ्यांच्या घरात सुरूंग पेरत आपली पोळी भाजून घेतली, आता फासे उलटे पडले. कर्माचा सिध्दांत सर्वांना लागू पडतो आता वेळ पवार साहेबांची आहे. भाजपने पवार यांच्या घरात सुरूंग पेरला आणि त्याची वात फडणवीस यांच्या हातात दिली. शिवसेनेप्रमाणेच आता फडणवीस यांच्यामुळे राष्ट्रवादीची म्हणजेच पवार कुटुंबाचीही दोन शकले झालीत. हा संघर्ष इतका टोकाला गेलाय की आता दादांना माघारीचे दरवाजेसुध्दा बंद झालेत. अशा परिस्थितीत केवळ पालकमंत्री पदासाठी दादांना नाक घासायची वेळ आली म्हणून ते नाराज होते. अमित शाहे यांच्या मुंबई दोऱ्याच्या वेळी ते बारामतीला होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईत आले तेव्हाही दादांनी तिकडेही पाठ फिरवली. पुणे शहरात त्यांनी आपले अर्थ खाते केव्हाही जाऊ शकते, असे विधान केल्याने शंकेची पाल चुकचुकली. पुणे शहर आणि जिल्ह्यात त्यांना मोठ मोठी शक्तीप्रदर्शने केली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील असताना अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन भाजप श्रेष्ठीना दणकाही दिला. मंगळवारी त्यांनी मंत्रीमंडळ बैठकीलाच दांडी मारली आणि काय तो सांगावा धाडला. कुठेतरी पाणी मुरतेय हे लक्षात आले. शिंदे-फडणवीस मिळून रातोरात दिल्लीला गेले आणि आज पुणे जिल्ह्याची सुत्रे चंद्रकांत पाटील यांच्याकडून काढून ती अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केली. भाजप मोठा भाऊ असल्याने त्यागाची भूमिका घेत असल्याचे फडणवीस यांना सांगावे लागले आणि दादांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले. अजित पवार यांना तोंड दाबून बुक्याचा मार मिळतोय, भाजपने त्यांची बोलती बंद केलीय, त्यांना बाजूला ढकलले आहे अशा अफवांनी राजकारण आणि माध्यमांचा फोकस अजित पवार यांच्यावर होता. त्याचाही मोठा फटका भाजपला बसत होता. नाविलाज म्हणून निर्णय घ्यावा लागला.

चंद्रकांत पाटील कुचकामी ठरले –
पालकमंत्री म्हणून अजित पवार ज्या तडफेने प्रकऱणे निकालात काढायची ते काम चंद्रकांत पाटील यांना जमले नाही. भाजपचे निष्ठावंत म्हणून त्यांची नाराजी ओढावून घ्यायला कोणी तयार नव्हते, पण अखर तो निर्णय करावा लागला. अजित पवार यांची कार्यशैली अधिकाऱ्यांना परिचित होती म्हणून त्यांची बैठक असेल तर पूर्व तयारीसह अधिकारी येत. चंद्रकांत पाटील यांच्या बैठकिला ते चित्र कधी दिसलेच नाही. भाजपच्या दृष्टीने तसा पाटील यांचा फायदा नव्हताच कारण त्यांचा प्रभाव पडत नव्हता. आता अजितदादा पुन्हा पाकलमंत्री झाल्याने राष्ट्रवादीला गुदगुल्या झाल्या पण दुसरीकडे भाजपचे टेन्शन वाढले. जे अजितदादा सांगणार तेच होणार. पिंपरी चिंचवड शहरात भोसरीकर आमदार महेश लांडगे यांनी अजितदादांना पालकमंत्रीपद दऊ नये यासाठी फडणवीस यांच्याकडे तगादा लावला होता आणि अक्षरशः देव पाण्यात ठेवले होते. कारण गेल्या पाच वर्षांत पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता असताना जो शेकडो कोटींचा भ्रष्टाचार झाला त्याच्या चौकशीचे सुतोवाच दादांनी केले होते. महापालिकेत तीन तास अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन लेखाजोखा मागितला होता. दादा खोलात गेले तर भाजपला ते खूप जड जाणार हे भाजपच्या आमदारांनी ओळखले होते. आगामी काळात महापालिका निवडणुकित अजितदादा सांगतील त पूर्व दिशा असणार आहे. महेश लांडगे किंवा चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांचा शब्द तिथे चालणार नाही. पालकमंत्री म्हणून अजित पवार शहराचे प्रश्न सोडवू लागले तर त्याचा फायदा राष्ट्रवादीला होणार आणि महापालिकेला भाजपला गाशा गुंडाळावा लागेल ही धास्ती भाजपच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांना आहे. जे पिंपरी चिंचवड शहरात तेच पुणे शहरातील चित्र असेल. त्या अर्थाने अजितदादांचे पालकमंत्रीपद खूप महत्वाचे आहे. पालकमंत्री असताना आपले काका शरद पवार यांच्या गणिमी काव्याला आता दादा कसे तोंड देतात ते पहायचे.