पाणीपुरवठ्याची कामे करणार्‍या ठेकेदारांना 48 कोटींची ‘रिलीफ’

0
233

पिंपरी,दि.०२(पीसीबी) – राज्य सरकारच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या ‘जीआर’चा आधार घेत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी जलकुंभ, पंपहाऊस उभारणे, मुख्य नलिका टाकणे, जलशुद्धीकरण केंद्राची क्ष्मता वाढविणे, जुलशुद्धीकरण केंद्राची देखभाल – दुरुस्ती करणे ही कामे करणार्‍या 8 ठेकेदारांना असाधारण भाववाढीसाठी विशेष मदत म्हणून 18 टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) म्हणजेच 48 कोटी 10 लाख रुपयांची ‘विशेष मदत’ (स्पेशल रिलीफ) देण्याचा निर्णय घेतला आहे.

पाणीपुरवठा योजनांच्या निविदेत भावभिन्नता कलमाचा समावेश करणे आणि असाधारण भावववाढीसाठी विेशेष मदत करण्याच्या 8 प्रस्तावांना मंगळवारी झालेल्या स्थायी समिती सभेत मान्यता दिली. त्यानुसार 267 कोटी 27 लाख 27 हजार 653 कोटी रुपयांच्या निविदा रकमेनुसार ठेकेदारांना 18 टक्के जीएसटी अदा करण्यात येणार आहे. भाववाढीच्या अनुषंगाने देण्यात येणार्‍या विशेष मदतीचे देयक (बील) अदा करण्यापुर्वी कंत्राटदारांकडून बाँडपेपरवर लेखी अभिवचन (अंडरटेकींग) घेतले जाणार आहे. 8 ही ठेकेदारांना विशेष मदत म्हणून निविदा रकमेवर 18 टक्के जीएसटी अदा करण्यात येणार आहे.

किवळे, सेक्टर 96, पुनावळे, – ताथवडे, या ठिकाणी जलकुंभ उभारणे, पंप हाऊस उभारणे हे 51 कोटी 78 लाख 24 हजार 636 रुपये निविदेचे कंत्राट एस.एस.साठे यांना मिळाले आहे. सद्यस्थितीत हे काम 12 टक्के पूर्ण झाले आहे. डुडुळगाव, चोविसावाडी, वडमुखवाडी आणि चर्‍होली या ठिकाणी पाण्याची मुख्य नलिका टाकणे, आठ उंच पाण्याच्या टाक्या उभारणे, शुद्ध पाण्याची टाकी व पंप हाऊस उभारणे हे 48 कोटी 34 लाखाचे काम गुडवील कन्स्ट्रक्शन यांना मिळाले आहे. सध्या हे काम 65 टक्के पूर्ण झाले आहे. वाकड, थेरगाव या भागात सात उंच पाण्याच्या टाक्या उभारणे, भोसरीत पाण्याची मुख्य नलिका व एक पंप हाऊस उभारण्यात येत आहे. 64 कोटी 65 लाख रूपये निविदेचे कंत्राट रूद्राणी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांना मिळाले आहे. सद्यस्थितीत हे काम आठ टक्के पूर्ण झाले आहे.

चिखली, मोशी येथे पाण्याची मुख्य नलिका टाकणे, तीन उंच पाण्याच्या टाक्या उभारणे हे 59 कोटी 43 लाखाचे काम अरिहंत कन्स्ट्रक्श्न यांना मिळाले आहे. सद्यस्थितीत हे काम 42 टक्के पूर्ण झाले आहे. जलशुद्धीकरण केंद्र सेक्टर 23 येथील टप्पा एकच्या फिल्टर बेडची वाळू बदलणे, सुरक्षा आवरण तयार करण्याचे काम मारूती एंटरप्रायजेस यांना मिळाले आहे. हे काम 13 एप्रिल 2022 रोजी पूर्ण झाले आहे. मात्र, जलशुद्धीकरण केंद्र ते वाळू आणण्याचे ठिकाण यामधील अंतर 610 किलोमीटर एवढे लांब आहे. तसेच वाळू दरातही मोठी तफावत आहे. त्यामुळे ठेकेदाराने 20 सप्टेबरच्या पत्राद्वारे त्यांना विशेष मदत म्हणून 31 लाख 55 हजार रूपये आणि निविदा रकमेवर 18 टक्के जीएसटी दिला जाणार आहे.

निगडी सेक्टर 23 येथील देखभाल व दुरूस्ती आणि इतर अनुषंगिक कामे एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांना मिळाले आहे. सध्या हे काम 70 टक्के पूर्ण झाले आहे. त्यांना विशेष मदत म्हणून निविदा रकमेवर 18 टक्के जीएसटी देण्यात येणार आहे. सेक्टर 23 येथील विविध युनिटसची स्ट्रक्चरल ऑडीटच्या अहवालानुसार देखभाल-दुरूस्ती करण्यात येणार आहे. 3 कोटी 49 लाखाचे हे काम मंगलदास इन्फ्राटेक यांना मिळाले आहे. हे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. त्यांनाही 18 टक्के जीएसटीची विशेष मदत मिळणार आहे. जलशुद्धीकरण केंद्र सेक्टर 23 येथील टप्पा दोनच्या फिल्टर बेडची वाळू बदलणे, सुरक्षा आवरण तयार करण्याचे काम शिवम एंटरप्रायजेस यांना मिळाले आहे. हे काम 26 फेब्रुवारी 2021 रोजी पूर्ण झाले आहे. मात्र, वाळू दरात झालेल्या वाढीमुळे त्यांना विशेष मदत म्हणून 10 लाख 6 हजार रूपये आणि निविदा रकमेवर 18 टक्के जीएसटी दिला जाणार आहे.