पाच राज्यांतील उमेदवारीवरून INDIA आघाडी फुटायच्या बेतात

0
318

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) : केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला आगामी सर्वच निवडणुकांमध्ये टक्कर देण्यासाठी ज्या INDIA आघाडीची निर्मिती झाली होती, त्यामध्ये सगळं काही आलबेल असल्याचे चित्र नाही. नुकत्याच जाहीर झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाच्या मुद्यावरून या आघाडीतील मोठा घटक असलेल्या समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी थेट काँग्रेसवर टीका केली.

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने जागा वाटपात समाजवादी पक्षासाठी एकही जागा न सोडल्याने अखिलेश यादव यांनी संताप व्यक्त केला. त्यातच त्यांनी आपल्या X अकाऊंटवर एक पोस्ट अपडेट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी INDIA आघाडीचा उल्लेख न करता आपल्या जुन्या परंपरेप्रमाणे PDA या शब्दाचा उल्लेख केला आहे.
मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षासाठी सहा जागा सोडल्या जातील, असे आश्वासन काँग्रेसकडून देण्यात आले होते. पण प्रत्यक्षात काँग्रेसने या निवडणुकीसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यावेळी समाजवादी पक्षासाठी एकही जागा सोडण्यात आलेली नाही. यामुळे समाजवादी पक्षाने या राज्यात काँग्रेसविरोधात आता १८ मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार दिले आहेत. त्यामुळे या सर्व ठिकाणी INDIA आघाडीतील उमेदवार एकमेकांविरोधात लढताना दिसणार आहेत. येत्या १७ नोव्हेंबरला मध्य प्रदेशमध्ये एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होते आहे.

अखिलेश यादव यांनी X या सोशल मीडिया हँडलवर रविवारी एक पोस्ट प्रसिद्ध केली आहे. या पोस्टमध्ये एक फोटो आहे. ज्यामध्ये एका माणसाच्या पाठीवर हिंदीमध्ये मजकूर लिहिण्यात आला आहे. या मजकुराचा अर्थ असा आहे की, मिशन २०२४. नेताजी अमर रहे. PDA ला विश्वास आहे की अखिलेश यादव यावेळी निवडणूक नक्की जिंकतील. गरिबांना नक्की न्याय मिळेल. पोस्टमधील PDA शब्दाचा अर्थ असा आहे की, पी म्हणजे पिछडे अर्थात मागासलेले, डी म्हणजे दलित आणि ए म्हणजे अल्पसंख्याक. २०२४ च्या निवडणुकीत PDA नक्की जिंकेल, असेही त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.