गुजरात , दि. १९ (पीसीबी) – गेल्या अडीच वर्षापासून कोरोनाने जगभरात थैमान घातलं . भारतालाही कोरोनाचा मोठा धक्का बसला. अनेकांचा कोरोनामुळे बळी गेल्याचे पाहायला मिळालं. कोविडमुळे अनेकांना उपचार घेण्यासाठी बेड आणि ऑक्सिजन उपलब्ध नसल्याने प्राण गमवावे लागले.
मात्र आता गेल्या काही दिवसांपासून देशात कोविडमुळे झालेल्या मृत्यंच्या आकडेवारीवरुन राजकारण सुरु असल्याचे पाहायला मिळालं. जागतिक आरोग्य संघटनेकडून जानेवारी महिन्यात जागतिक स्तरावरील करोना मृत्यूसंख्येबाबतचा अहवाल तयार करण्यासाठी भारताकडून देण्यात आलेली आकडेवारी दडवण्यात आल्याचा दावा ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने केला होता. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं होतं.
यानंतर आता पुन्हा एकदा एका अभ्यासानुसार गुजरातमध्ये झालेल्या कोरोना मृत्युंबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
एका अभ्यासानुसार, मार्च २०२० ते एप्रिल २०२१ या कालावधीत गुजरातमधील १६२ पैकी ९० नगरपालिकांमध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत मृत्यू झालेल्यांची संख्या राज्याच्या अधिकृत कोविड मृत्यू दराच्या दुप्पट असल्याची माहिती समोर आली आहे.
हार्वर्ड टी.एच. चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ, अमेरिका मधील संशोधक आणि सहकाऱ्यांनी,कोविड-19 साथीच्या रोगाच्या प्रभावामुळे झालेल्या मृत्यूंचाअंदाज लावण्यासाठी गुजरातमधील १६२ पैकी ९० नगरपालिकांमधील नागरी मृत्यू नोंदणीमधील माहितीचा वापर केला.
पीएलओएस ग्लोबल पब्लिक हेल्थ जर्नलमध्ये मंगळवारी प्रकाशित झालेल्या या अभ्यासात मार्च २०२० ते एप्रिल २०२१ या कालावधीत सर्वाधीक कोरोना मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.
या कालावधीत या ९० नगरपालिकांमध्ये अतिरिक्त २१,३०० मृत्यूंचा अंदाज लावला आहे, जे अपेक्षेपेक्षा ४४ टक्के जास्त आहे, असे लेखकांनी सांगितले. यापैकी बहुतेक अतिरिक्त मृत्यू इतर कोणत्याही आपत्तीच्या अनुपस्थितीत कोविड-19 मुळे झालेले मृत्यू मानले जाऊ शकतात. या कालावधीतील अधिकृत सरकारी आकडेवारीनुसार संपूर्ण गुजरातमध्ये कोविडममुळे १०,०९८ मृत्यू झाल्याचे संशोधकांनी सांगितले.
तर एप्रिल २०२१ च्या अखेरीस मृत्यूमध्ये तीव्र वाढ दिसून आली. मृतांची संख्या अंदाजित संख्येपेक्षा ६७८ टक्क्यांनी वाढली. इतर वयोगटांच्या तुलनेत ४० ते ६५या वयोगटातील मृत्यूदरात सर्वाधिक वाढ झाल्याचे या अभ्यासात आढळून आले आहे.
२०११ च्या जनगणनेवर आधारित या ९० नगरपालिकांसाठी जास्त मृत्यूचा अंदाज लोकसंख्येच्या ८ टक्के आहे, असे संशोधकांनी सांगितले. भारतात मे २०२१ मध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटची लाट शिगेला पोहोचण्यापूर्वीच गुजरातमधील मृत्यू हे अधिकृत आकडेवारीपेक्षा जास्त आहेत.
दरम्यान, याआधीच्या अभ्यासातून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, भारतातील कोविड मृत्युदर अधिकृत आकडेवारीपेक्षा खूप जास्त आहे. गेल्या वर्षभरात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अशा अंदाज आणि कार्यपद्धतीला आव्हान दिले होते.
या संदर्भातील अहवाल तयार करणाऱ्यांनी सांगितले की अधिकृत मृत्यू नोंदणीनुसार गुजरातमध्ये मार्च २०२०ते एप्रिल २०२१ या कालावधीत उच्च मृत्यू दराचा भक्कम पुरावा समोर आला आहे.
हार्वर्ड विद्यापीठाव्यतिरिक्त, यामध्ये नॅशनल फाउंडेशन फॉर इंडिया, नवी दिल्ली, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन आणि कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले, अमेरिका मधील संशोधकांचाही समावेश होता.











































