पर्यावरणाचा र्‍हास थांबविण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा – खा. वंदना चव्हाण

0
462

– पर्यावरणदिनाचे औचित्य साधत वनराई आणि गुडविल फाउंडेशनचा स्तूत्य उपक्रम

पुणे, दि. ५ (पीसीबी) – भविष्यातील आपल्या पिढ्यांसाठी पृथ्वी सुरक्षित ठेवायची असेल तर आजच्या या आधुनिक जगामध्ये टाकावू वस्तूंचा व कचऱ्याचा पुनर्वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. टाकावू प्लास्टिक कचऱ्याचे पुनर्वापर करणे हा एक आपले पर्यावरण वाचवण्याचा उत्तम मार्ग आहे. आपण वापरत नाही अशा टाकावू प्लास्टिक कचऱ्यापासून आपण विविध नवीन जीवनउपयोगी वस्तू तयार करू शकतो आणि त्यांचा वापर करू शकतो. केवळ कायदे करून वा नगरपालिकेची कार्यक्षमता वाढवून या समस्येचे निराकरण करता येणार नाही. याउलट लोकांची मानसिकता बदलली आणि त्यांनी जाणीवपूर्वक यात सहभाग घेतला तर एरवी अशक्य व खर्चिक वाटणारी ही योजना अत्यंत कमी खर्चात प्रभावीपणे यशस्वीपणे राबविता येईल. असे प्रतिपादन खा. वंदना चव्हाण यांनी केले.

‘जागतिक पर्यावरण दिना’चे औचित्य साधत ‘वनराई’ आणि ‘गुडविल फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पुनर्वापरयोग्य जुने कपडे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू संकलन केंद्रा’चे उद्घाटन मा. खा. अॅड. वंदनाताई चव्हाण यांच्या शुभहस्ते झाले. गुडलक चौकाजवळील पेट्रोलपंपावर हे केंद्र सुरु करण्यात आले आहे. अशा प्रकारची संकलन केंद्रे पुणे शहराच्या विविध भागांमध्ये किमान २० ठिकाणी सुरू करण्याचा मानस या संस्थांचा असून, या वस्तूंचा पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरण केले जाणार आहे. ज्यामुळे शहराच्या अनावश्यक कचऱ्यात घट आणि पर्यावरण संवर्धन होणार आहे. तसेच गरीब व गरजू लोकांना या वस्तूंचा लाभ मिळणार आहे.

यावेळी वनराईचे अध्यक्ष रविंद्र धारिया, सचिव अमित वाडेकर, गुडविल फाउंडेशनचे अध्यक्ष कालिदास मोरे, कोहीनूर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक कृष्णकुमार गोयल, नगरसेविका माधूरी सहस्त्रबुद्धे, मंजुश्री खर्डेकर, नितीन कांकरीया, रोहिदास मोरे, महेश सुर्यवंशी उपस्थित होते.

वनराईचे अध्यक्ष रविंद्र धारिया म्हणाले की, वाढत्या शहरीकरणामुळे कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी फार थोडी जागा शिल्लक राहिली आहे. योग्य कचरा व्यवस्थापन हे सामाजिक आणि पर्यावरणीय आरोग्य राखण्यासाठी गरजेचे आहे. लोकसहभागाने या समस्येवर तोडगा काढणे ही एक काळाची गरज आहे. घन कचरा स्वत: वाहून जात नाही. तो उचलून न्यावा लागतो यामुळे प्रदूषण त्या जागीच मर्यादित राहत असले तरी न वापरातील सर्व जागा हळुहळू कचऱ्याने व्यापल्या जातात आणि प्रत्यक्ष कृतीशिवाय स्वच्छता होत नाही.

गुडविल फाउंडेशनचे अध्यक्ष कैलास मोरे म्हणाले, पुनर्चक्रीकरण प्रक्रियेच्या मदतीने पर्यावरणातील कचरा कमी होण्यास मदत होते. पुनर्वापर या प्रक्रियेचा आणखी एक फायदा म्हणजे एखादी नवीन वस्तू तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे आणि उर्जेचे प्रमाणसुद्धा कमी होण्यास मदत होते. इलेक्ट्रॉनिक वस्तू, संगणक, मोबाईल्स यासारख्या आपल्या सध्याच्या आधुनिक जीवनशैलीची गरज बनलेल्या वस्तूंमुळे जगभरातल्या पर्यावरणाच्या समस्या वाढत आहेत. यातील सर्वात मोठी समस्या आहे ती ई-कचऱ्याची. बिघडलेले किंवा खराब झालेले मोबाइल फोन्स, लॅपटॉप, टेलिव्हिजन संच, आणि कॉम्प्युटर्स यांसारख्या वस्तूंमुळे आरोग्य आणि पर्यावरणाच्या समस्या निर्माण होत आहेत. या समस्या कमी करण्यासाठी गुडविल फाउंडेशन काम करत आहे.