परवानगीशिवाय झाडे तोडणारा अन् लाकडे गायब करणारा उद्यान सुपरवायझर निलंबित

0
363

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – वरिष्ठांना कोणतीही पूर्व कल्पना न देता वृक्षतोड आणि बेकायदेशीरपणे खासगी यंत्रणेमार्फत वृक्षतोड करुन लाकडे गायब करणा-या महापालिकेच्या असिस्टंट हॉर्टी सुपरवायझरला निलंबित केले. त्याची खातेनिहाय चौकशी सुरु करण्याचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.

संतोष भिमाजी लांडगे असे निलंबित करुन विभागीय चौकशी सुरु केलेल्या असि. हॉर्टी सुपरवाझयरचे नाव आहे. लांडगे हे महापालिकेच्या उद्यान विभागात सुपरवाझयर पदावर कार्यरत असून त्यांच्याकडे ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत वृक्षसंवर्धन विषयक कामकाज सोपविण्यात आले आहे. महापालिकेच्या नेहरुनगर येथील हॉकी स्टेडियम येथे स्थापत्य व क्रीडा विभागामार्फत क्रींडागणाच्या विस्तारीकरणाकरिता वृक्ष काढण्याची उद्यान विभागाकडे विनंती करण्यात आली होती. त्यानुसार वृक्ष प्राधिकरण समितीने 7 डिसेंबर 2021 रोजी 95 सुबाभुळ, 2 कडुलिंब, 3 पेल्टाफोरम, 1 निलगिरी, 6 बेहडा असे 107 वृक्ष पूर्ण काढण्यासाठी परवानगी दिली होती. त्यानुसार जानेवारी 2022 अखेर धोकादायक 35 सुबाभुळ काढण्यात आले. उर्वरित वृक्ष क्रींडागणाच्या विस्तारीकरणाचे काम चालू झाल्यानंतर काढण्याचे प्रयोजन होते. त्यानुसार वृक्षतोडीबाबत कार्यवाही होणे आवश्यक होते.

तथापि, लांडगे यांनी परस्पर, वरिष्ठांना पूर्वकल्पना न देता 58 सुबाभुळ, 2 कांचन, 2 कडुलिंब, 1 पिंपळ आणि दिलेल्या परवानगी व्यतिरिक्त 1 कांचन, 2 कडुनिंब, 1 पिंपळ अशा 4 वृक्षांची खासगी यंत्रणेमार्फत बेकायदेशीर वृक्षतोड केली. त्याची लाकडे उद्यान विभागात जमा केली नसल्याचे 16 जून 2022 रोजी निदर्शनास आले. उद्यान विभागाचे उपायुक्त, प्रभारी उद्यान अधिक्षक यांनी याबाबत आयुक्तांना सांगितले. ही बाब गंभीर स्वरुपाची आहे. लांडगे यांनी अनाधिकाराने स्वत:च्या फायदा होण्याच्या दृष्टीने गंभीर अनियमितता केली. त्यामुळे कामकाजातील हलगर्जीपणा, बेजबाबदार वर्तनाबाबत उद्यान विभागामार्फत लांडगे यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली.

त्यावर लाकडे गुलाब पुष्प उद्यानात जमा केल्याचा खुलासा लांडगे यांनी केली. प्रत्यक्षात 2 जून 2022 रोजी तोडलेल्या झाडाची लाकडे मटेरियल इन, आउट रजिस्टरमध्ये नोंद केल्याचे आढळून आले नाही. लांडगे यांचा खुलासा संयुक्त नसून वस्तुस्थितीला धरुन नसल्याने दिशाभूल करणारा आहे. त्यामुळे विभागप्रमुखांनी शिस्तभंगविषयक कारवाईची शिफारस केली. लांडगे हे प्रत्यक्ष सेवेत राहिल्यास अडचणींची परिस्थिती निर्माण होण्यास, तपासात अडथळा निर्माण होण्याचा संभव आहे. उपलब्ध पुराव्यात फेरफार करण्यास कोणताही वाव मिळणार नाही, यासाठी संतोष लांडगे यांना सेवा निलंबित केले. त्यांची विभागीय चौकशी सुरु करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. या आदेशाची त्यांच्या सेवा पुस्तकात नोंद केली जाणार आहे.