परदेशी गुंतवणूकीची त्सुनामी : वरदान की शाप ?- सारंग कामतेकर

0
109

परकीय गुंतवणुकीच्या वाढीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन होत असल्याच्या बातम्या सातत्त्याने झळकत आहे. आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीचा वाढता प्रवाह विविध क्षेत्र आणि आकारांमधील कंपन्यांना व्यापून टाकत आहे. हा प्रवाह, आश्वासक असताना, त्याच्या छुप्या प्रवाहांशिवाय नाही. आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीचे संभाव्य परिणाम हे रोजगाराच्या बाजारपेठेवर आणि नवोदित व प्रस्तापित उद्योजकांसाठी महत्वाचे ठरतात.

भारतातील वाढत्या मध्यमवर्गीयांच्या रूपाने तयार झालेला प्रचंड मोठा ग्राहकवर्ग, तांत्रिकदृष्ट्या कुशल कामगार, युवा लोकसंख्या आणि विकासाच्या पथावर असलेला देश, एक आकर्षक बाजारपेठ म्हणून परकीय गुंतवणुकदारांना भुरळ घालत आहे. आगामी पंवीस – तीस वर्षात भारताची लोकसंख्या तब्बल २५ कोटींनी वाढणार आहे. त्यामुळे अशा बाजारपेठेतील सहभागातून अधिक आर्थिक लाभ मिळविण्यासाठी अंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार भारतामध्ये गुंतवणूक करू लागले आहेत. मात्र अशी गुंतवणूक करताना या संस्था व्यवस्थापकीय व तांत्रिक बाबींसारख्या महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आपलेच मनुष्यबळ घेऊन येतात. त्यामुळे भारतातील अनुभवी व पात्र व्यक्तींना महत्वाच्या जबाबदाऱ्यांपासून वंचित रहावे लागते अथवा कामाच्या ठिकाणी बढती मिळत नाही. परदेशी कंपन्यांमधील स्थानिक कर्मचार्‍यांसाठी प्रगतीसाठी मर्यादित संधी उपलब्ध असल्याने त्यांची वाढ आणि करिअरच्या आकांक्षा खुंटतात. परकीय गुंतवणूकदार आपल्यासोबत आधुनिक तंत्रज्ञान घेऊन येतात, त्यामुळे देखील स्थानिक कामगारांना कामाची संधी मिळत नाही. अंतरराष्ट्रीय कंपन्या ऑटोमेशन आणि कॉस्ट-कटिंगवर अधिक लक्ष केंद्रित करतात त्यामुळे देखील स्थानिक कामगारांचे विस्थापन होते. ऑटोमेशनवरील अवलंबनामुळे अनेक कौशल्ये औटडेटेड होऊ लागली आहेत. विविध कौशलयात पारंगत असलेल्या कामगारांचे भविष्य असुरक्षित होऊ लागले आहे.

बलाढ्य अंतरराष्ट्रीय संस्था प्रचंड आर्थिक बळ घेऊन भारतीय बाजारपेठांमध्ये उतरत असल्याने नवोदित व होतकरू भारतीय उद्योजकांपुढेच नव्हे तर प्रस्थापितांपुढे देखील मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अनुभवी जागतिक ब्रँड सहजतेने बाजारपेठेतील मोठा शेअर / वाटा मिळवतात, त्यामुळे बाजारपेठेतील भारतीय व्यावसायिकांच्या शेअर / वाट्याची स्पर्धा तितकीच भयावह होऊ लागली आहे. स्थानिक व्यवसायिकांना आपले अस्तित्व टिकविण्यासाठी कडवा संघर्ष करावा लागत आहे. परदेशी ब्रँड्सचे वर्चस्व बाजाराला एकसंध बनवते, ग्राहकांची निवड आणि विविधता त्यामुळे आपोआपच कमी होते. परदेशी ब्रँड्सच्या चकाकीमागे धावणाऱ्या ग्राहकांमुळे भारतीय उत्पादनांना फारशी पसंती मिळत नाही. जाहिरातीच्या युगात अपुऱ्या अथवा मर्यादित भांडवलामुळे भारतीय व्यवसायिक / उद्योजक मागे पडत आहेत.

परकीय गुंतवणुकीच्या या लाटेचा सामना करण्यासाठी त्यातील नकारात्मक प्रवाहांना समजून घेणे आवश्यक आहे. अशा लाटेत भारतीय प्रतिभा आणि नवकल्पना वाहून जाण्यापासून रोखण्यासाठी, सक्रिय उपाययोजना आखून व कार्यान्वित करणे महत्त्वपूर्ण आहे. तंत्रज्ञान हस्तांतरणाला चालना देताना सरकार स्थानिक कामगारांच्या रोजगार आणि कौशल्य वाढीला प्राधान्य देणाऱ्या परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देऊ शकते. भांडवलाची सुलभ उपलब्धता, इनक्युबेशन सेंटर्स आणि मेंटॉरशिप प्रोग्रामद्वारे भारतीय उद्योजकांना पाठिंबा देणे हे आणखी एक महत्त्वाचे पाउल आहे. शासनाच्या वतीने शिक्षण आणि कौशल्य विकासामध्ये गुंतवणूक केल्याने जागतिकीकृत बाजारपेठेत स्पर्धा करण्यासाठी आवश्यक असलेल्या साधनांसह भारतीयांना सुसज्ज बनवता येईल. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये नवकल्पना आणि कौशल्याला प्रोत्साहन दिल्याने प्रस्थापित आणि उदयोन्मुख व्यवसायांसाठी नवीन संधी निर्माण होऊ शकेल.

भारताच्या आर्थिक विकासाचे भवितव्य हे केवळ जीडीपीच्या आकडेवारीचा विषय नाही; तर ते सर्वसमावेशक आणि शाश्वत मार्ग सुनिश्चित करण्यावर अवलंबून आहे. परकीय गुंतवणुकीतील संभाव्य तोटे वेळीच ओळखून ते कमी करण्यासाठी पावले उचलल्यास, या आर्थिक उलाढालीचा उपयोग करून देशवासीयांसाठी असे भविष्य घडवू शकेल जिथे जागतिक दिग्गज आणि भारतीय नागरिक दोघेही भरभराटीस येतील.