Desh

नोट बदली संदर्भात मोठी बातमी…! एसबीआयने जारी केले नवे निर्देश…

By PCB Author

May 22, 2023

देश,दि.२२(पीसीबी) – रिझर्व्ह बॅंकेने शुक्रवारी 2000 च्या नोटा चलनातून बाद होणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, रिझर्व्ह बॅंकेने नोटा बदलून घेण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. या काळात लोक बॅंकांमध्ये जाऊन त्यांच्या 2000 च्या नोटा इतर चलनी नोटांसह बदलू शकतात. आता, स्टेट बॅंकेने आपल्या सर्व स्थानिक मुख्य कार्यालयांच्या मुख्य महाव्यवस्थापकांना पाठवलेल्या माहितीमध्ये, 20,000 रुपयांपर्यंतच्या 2,000 रुपयांच्या नोटा कोणत्याही ओळखपत्र पुराव्याशिवाय आणि डिमांड स्लिपशिवाय बदलल्या जाऊ शकतात अशी माहिती दिली आहे.

रिझर्व्ह बॅंकेने दोन हजाराच्या नोटा स्वत:च्या खात्यात जमा करण्यासाठी कोणतीही मर्यादा निश्‍चित केलेली नाही, परंतु ती ग्राहकांच्या केवायसी आणि इतर वैधानिक नियमांवर अवलंबून असेल. 20 मे रोजी पाठवलेल्या माहितीमध्ये स्टेट बॅंकेने म्हटले आहे की 2,000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी कोणत्याही ओळखपत्राची आवश्‍यकता नाही. 2,000 रुपयांच्या नोटांची देवाणघेवाण करण्याची संपूर्ण प्रक्रिया त्रासमुक्त आणि सुरळीत व्हावी यासाठी बॅंकेने आपल्या अधिकाऱ्यांना जनतेशी सहकार्य करण्यास सांगितले आहे.

23 मे पासून नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार होती मात्र काही लोक शनिवारीच बॅंकेत पोहोचले. एसबीआयने सांगितले की, अशा लोकांना समजावल्यानंतर परत पाठवण्यात आले. काही ग्राहकांनी बॅंकेत 2,000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी डिपॉझिट मशीनचा वापर केला. काही लोकांनी दोन हजाराच्या नोटा खर्च करण्याचा प्रयत्न केला, मात्र रिझर्व्ह बॅंकेच्या नोटिफिकेशननंतर लोक दोन हजाराच्या नोटा बाजारात घेण्यास टाळाटाळ करत आहेत हे प्रथम दर्शनी दिसून आले.