पिंपरी दि. ११ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय शालेय ज्युनियर व सब ज्युनियर नेहरूकप हॉकी स्पर्धेत 17 वर्षाखालील मुली (ज्युनियर) गटात एस एन बी पी इंटरनॅशनल स्कूल मोरवाडी या संघाने अंतिम सामन्यात विजय मिळवत बालेवाडी येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले.
8 ते 10 ऑगस्ट 2022 दरम्यान महापालिकेच्या मेजर ध्यानचंद पॉलीग्रास हॉकी स्टेडीयम या ठिकाणी जिल्हा स्तरीय हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या तीन दिवसीय हॉकी स्पर्धेचे उद्घाटन उप आयुक्त विठ्ठल जोशी यांच्या हस्ते करण्यात आले होते. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी अंतिम सामन्यात एस एन बी पी इंटरनॅशनल स्कूल विरुध्द न्यू मिलेनियम हायस्कूल समर्थनगर संघ यांच्यात अंतिम लढत पार पडली. एस एन बी पी इंटरनॅशनल स्कूलच्या ज्ञानेश्वरी नरवडे या खेळाडूने तिसऱ्या मिनिटाला गोल करत आपल्या संघाचे खाते उघडले. तर, शायना मुलाणी या खेळाडूने 9 व्या आणि 20 व्या मिनीटाला गोल करत विरोधी संघावर आघाडी मिळवली.
इशा लवटे हीने 17 व्या मिनिटाला गोल करत तिसरा गोल संघाच्या नावावर केला. अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी असलेल्या न्यू मिलेनियम हायस्कूल समर्थनगर संघाला एकही गोल करता आला नाही. त्यामुळे ही लढत 4 – 0 अशी एकतर्फी झाली. एस एन बी पी इंटरनॅशनल स्कूल संघ बालेवाडी येथे होणा-या विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. 15 आणि 17 वर्षाखालील वयोगटामधील मुले मुली यांच्या जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेमध्ये एकूण 23 संघांचा सहभाग होता. तर, 361 खेळाडूंनी सहभागी झाले होते. 9 ऑगस्ट रोजी 15 वर्षाखालील मुले या गटामध्ये झालेल्या स्पर्धेतील अंतिम सामन्यात सेंट ज्युड हायस्कूल देहूरोड या संघाने विजय मिळवला.