पिंपरी, दि. २२ (पीसीबी) : अयोध्येतील मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. त्यानिमित्त श्री दुर्गेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट, श्री समर्थ युवक प्रतिष्ठान आणि माजी नगरसेवक अमित राजेंद्र गावडे यांच्या वतीने निगडीत सामूहिक श्री रामरक्षा स्त्रोत पठण घेण्यात आले. रामनामाचा जप, हनुमान चालीसा आणि मारूती स्तोत्रही घेण्यात आले.
निगडीतील ज्ञानशक्ती मंदिर येथे सकाळी साडे दहा वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रम झाले. परिसरातील शेकडो रामभक्तांनी सामूहिक रामरक्षा स्त्रोत पठण केले. संजीव रानडे, सौ. रानडे, प्रकाश गानू, उमा इनामदार, गणेश कुलकर्णी
चंद्रकांत कुलकर्णी यांनी रामनामाचा जप, हनुमान चालीसा आणि मारूती स्त्रोत म्हटले. त्यांच्यापाठीमागे नागरिकांनी स्त्रोताचे पठण केले. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा लाइव्ह कार्यक्रम स्क्रीनद्वारे दाखविण्यात आला. उपस्थित सर्व रामभक्तांना महाप्रसादाचे वाटप केले. कार्यक्रमाचे आखणी, नियोजन आणि सूत्रसंचालन चंद्रशेखर जोशी यांनी केले.
अमित गावडे म्हणाले की, हिंदू बांधवांचे 500 वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे जल्लोषात व आनंदात स्वागत केले. शहरात सर्वत्र राममय वातावरण झाले आहे. नागरिकांमध्ये उत्साह, आनंद दिसत आहे. शहरात दिवाळी साजरी होत आहे. विष्णू सहस्त्रनाम म्हटल्याचे पुण्य एकदा रामरक्षा म्हटल्याने मिळते. याच उदात्त उद्देशाने प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणी एकत्र येऊन रामरक्षा स्त्रोत पठण सोहळा आयोजित करण्यात आला होता.