निखिल वागळे यांची हल्ल्यानंतरची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी

0
178

मुंबई, दि. १० (पीसीबी) – पुण्यातील सिंहगड रोडवर असलेल्या राष्ट्रसेवा दलात वरिष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या ‘निर्भय बनो’ या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर काल रात्री पुण्यात हल्ला झाला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांच्या गाडीची तोडफोड केली. त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. तसंच वागळेंच्या गाडीवर शाई फेकण्यात आली. या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटले. यानंतर निखिल वागळे यांनी पहिली फेसबुक पोस्ट शेअर केला आहे. मदत करणाऱ्यांचे वागळे यांनी आभार मानले आहेत. तसंच हल्ल्यावेळी नेमकं काय झालं? याची हकिकतही निखिल वागळे यांची या पोस्टच्या माध्यमातून सांगितलं आहे.

प्रिय मित्र- मैत्रिणीनो, भावांनो-बहिणींनो,

काल मृत्यू दारात दारात उभा राहिला होता. केवळ तुमच्या प्रेमामुळे वाचलो.
मला इजा होऊ नये म्हणून काचांचे तुकडे रुतले तरी मागे न हटणारा असीम सरोदे.,जीवाची बाजी लावून आमची गाडी हाकणारा आमचा सारथी वैभव, पुढच्या सीटवर बसून हल्ला अंगावर घेणारी ॲड श्रीया, शेवटपर्यंत साथ देणारे विश्वंभर, रस्त्यावर उतरुन हल्लेखोरांशी दोन हात करणारा बंटी, भक्ती कुंभार आणि असंख्य कार्यकर्ते यांचं ऋण मी कसं फेडू? भाजपच्या गुंडाशी दोन हात करणारे राहुल डंबाले, प्रशांतदादा जगताप यांची कुमक..कॅांग्रेसचे अरविंद शिंदे, वंचित आणि आपचे कार्यकर्ते, धोका पत्करुन मला मुंबईत पोहोचवणारा नितीन वैद्य..कुणाकुणाची नावं घेऊ? सगळ्यांचा मी ऋणी आहे.

आजवर सहा हल्ले पचवले. कालचा हल्ला सगळ्यात भयानक होता. दगड, लाठ्याकाठ्या, हॅाकी स्टिक्स, रॅाड्स, अंडी, शाई सगळ्याचा वापर झाला. अवघ्या अर्ध्या तासात चार वेळा पाठलाग करुन आम्हाला घेरण्यात आलं. पोलीसांच्या संगनमताने हा हल्ला झाला. काल आम्ही सगळे वाचलो केवळ फुले-आंबेडकर यांच्या आशिर्वादाने ही माझी श्रद्धा आहे.

आता यापुढचं आयुष्य तुमच्यासाठी. फॅसिजमचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढू. अशा भ्याड हल्लांची भीती बाळगण्याचे आमचे संस्कार नाहीत. या देशाचा हिंदू पाकिस्तान होऊ नये म्हणून पुन्हा जीवाची बाजी लावेन एवढंच इथे सांगतो.

तुमचं सगळ्यांचं ऋण मी कधीच फेडू शकत नाही. कालची सभा यशस्वी करण्यासाठी तुम्ही सगळे झटलात..आभार कसे मानू? जास्त बोलवत नाही. कालच्या धक्क्यातून अजून बाहेर आलेलो नाही. संध्याकाळी तुमच्याशी सविस्तर बोलीनच.

तुमचा,

निखिल