नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देणं ही घोडचूक

0
280

पिंपरी, दि. १७ (पीसीबी)- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला आहे. सुरुवातीपासून म्हणजेच सुमारे ३८ वर्षे ते काँग्रेसमध्ये होते. मात्र काँग्रेसमध्ये घुसमट होऊ लागल्याने त्यांनी हा पक्ष सोडला आणि ते भाजपात गेले आहेत. भाजपात प्रवेश झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. महाविकास आघाडी सरकार, काँग्रेसमध्ये होणारी घुसमट, भाजपात का गेलो? या सगळ्यावर त्यांनी भाष्य केलं आहे. अशात नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला नको होता असंही वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं.

मी पक्ष बदलला कारण
मागच्या दोन ते तीन वर्षांपासून मी अस्वस्थ आहे. राजकारण करायचं आहे. इतक्या लवकर मला राजकीय क्षेत्रातून मला बाहेर पडायचं नाही. पण घुसमट सहन करत आपण एकाच पक्षात राहण्यापेक्षा मी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला. कुठल्या आमदाराला मी माझ्याबरोबर ये हे सांगितलेलं नाही. भाजपात विनाअट येण्याचा निर्णय हा सर्वस्वी माझा होता. असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. तसंच नाना पटोले यांच्यामुळेच घुसमट वाढली हे त्यांनी सांगितलं आहे.

“नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला ही तर सर्वात मोठी घोडचूक ठरली. अजित पवार, उद्धव ठाकरे हे सगळेच नाराज झाले होते. विधानसभेला अध्यक्ष नाही असं कसं काय? त्यानंतर ज्या घटना घडल्या, विद्यमान अध्यक्षांनी हातात सूत्रं घेतल्यानंतर ज्या गोष्टी घडल्या त्या पाहिल्या तर नाना पटोले जर अध्यक्ष राहिले असते तर सरकार गेलं नसतं आणि पुढच्या गोष्टी टाळत्या आल्या असत्या. विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा ही फार मोठी गोष्ट ठरली. काही चर्चा झाल्या होत्या. पण अध्यक्षपदाचा राजीनामा घेऊन ते पद रिक्त ठेवण्यात आलं. ज्या वेळी निर्णय होतात त्या प्रक्रिया सांगता येत नाहीत. पण ते घडलं नसतं तर अनेक गोष्टी झाल्या नसत्या. महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी मिळाली ती या घटनेपासून मिळाली असं माझं ठाम मत आहे” असं अशोक चव्हाण म्हणाले.

जिथे गेलो आहे तिथे चांगलं काम करणार
आता काय काय निर्णय त्यावेळी चुकले त्या चुका काढण्यात काही अर्थ नाही. ज्या पक्षात गेलो आहे तिथे चांगलं काम करायचं आहे. राष्ट्रीय स्तरावर आत्ता विचार केला तर काँग्रेसची देशभरात व्याप्ती होती. आज ती परिस्थिती भाजपाची नक्की आहे. भाजपाचा आवाका खूप मोठा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही वर्षांमध्ये जी कामं करुन एक इमेज तयार केली आहे ती मान्यच केली पाहिजे. असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. एबीपी माझावरच्या माझा कट्टा या कार्यक्रमात अशोक चव्हाण यांनी हे वक्तव्य केलं आहे.

मतदारांची मानसिकता बदलली आहे. लोकांना वाटतं की नेत्यांनी आपली कामं करावीत. सध्याची परिस्थिती बदलली आहे. सगळ्या अपेक्षा पूर्ण करता येत नाहीत. विरोधात असताना तर करताच येत नाहीत. लोकांच्या आणि मतदारांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत. लोकांना वाचाळवीर आवडत नाहीत. असंही अशोक चव्हाण म्हणाले आहेत.