गुजरात, दि. २१ (पीसीबी): गुजरात दंगलीतील बिल्कीस बानो हत्याकांड प्रकरणातील ११ आरोपींची शिक्षा पूर्ण होण्याआधीच त्यांना सोडण्यात आलं. याप्रकरणावरून देशभरात बराच गदारोळ झाला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. गुजरात दंगल प्रकरणातील नरोडा पाटीया हत्याकांडातील प्रमुख आरोपी भाजपाच्या माजी मंत्री माया कोडनानी आणि बजरंग दलाचे माजी नेते बाबू बजरंगी, विश्व हिंदू परिषदेचे नेते जयदीप पटेल यांच्यासह ६९ आरोपींची निर्दोष मुक्ता करण्यात आली आहे. अहमदाबादच्या विशेष कोर्टाने हा निर्णय दिला आहे. न्यायाधीश एस. के. बक्षी यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली.
२००२ साली गुजरातमध्ये दंगल उसळली होती. २७ फेब्रुवारी २००२ मध्ये उसळलेल्या दंगलीत इतर ९ ठिकाणीही दंगल झाली होती. यापैकी एक दंगल म्हणजे नरोडा गाम येथे उसळलेला हिंसाचार. या हिंसाचारात मुस्लिम मोहल्ला आणि कुंभार वास येथील घरांना पेटवण्यात आले होते. यावेळी ११ मुस्लिमांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.
परंतु, याप्रकरणी २०१० मध्ये खटला दाखल करण्यात आला. या खटल्याच्या जलद सुनावणीसाठी विशेष न्यायालयाचीही स्थापना करण्यात आली होती. परंतु, तरीही याप्रकरणी १३ वर्षे खटला सुरू राहिला. यावेळी ५२ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. या न्यायालायने ५ एप्रिल रोजी सुनावणीची कार्यवाही पूर्ण केली होती. या खटल्यातील ८६ आरोपींपैकी १७ आरोपींचे सुनावणीदरम्यान निधन झाले. त्यामुळे उर्वरित ६९ आरोपींविरोधात खटला सुरू होता. हे सर्व आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत. या खटल्यामध्ये जवळपास १८२ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली.
आरोपींची निर्दोष सुटका झाल्याचे कळताच त्यांच्या समर्थकांनी कोर्टाबाहेर “जय श्रीराम आणि भारत माता की जय” च्या घोषणा दिल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.