– शिवसेनेचे अंत होत असल्याच्या टीकेला ठाकरेंचे सडेतोड उत्तर
मुंबई, दि. १ (पीसीबी) : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी महाराष्ट्रात शिवसेनेचा अंत होत असून भाजपशी मुकाबला करण्याची क्षमता कोणत्याही राष्ट्रीय पक्षात नाही, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच महाराष्ट्रात शिवसेनेचा अंत होत असून, देशात फक्त भाजपच राहील, बाकी सर्व राजकीय पक्ष नष्ट होतील, असा दावा त्यांनी केला आहे. कोणताही राष्ट्रीय पक्ष या स्थितीत नाही जो भाजपला पराभूत करू शकेल असे विधान जे पी नड्डा यांनी केले होते. या नड्डांच्या विधानाला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी नड्डांच्या कौटुंबिक पक्षाबाबतच्या विधानाचाही चांगलाच समाचार घेत भाजपचा वंश तरी नेमका कोणता असे म्हणत भाजपचा वंश कुठून सुरू झाला हे ठरवणं गरजेचं आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना काल सक्तवसुली संचलनालयाने अटक केली असून आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आले आहे. या कारवाईवर बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला. “संजय राऊत हा माझा जुना मित्र आहे, त्याचा मला अभिमान आहे. त्याचा गुन्हा नसतानाही त्याला अटक करण्यात आली आहे. त्याचं मरण आलं तरी शरण जाणार नाही हे त्यांचं वाक्य मला खूप आवडतं.” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
ठाकरे म्हणाले की, नड्डांचे विधान हे देशाला हुकूमशाहीकडे नेणारे असून, ओडिसा, तेलंगणा, तामिळनाड महाराष्ट्रात शिवसेना ही संपण्याच्या मार्गावर असल्याचे म्हटले आहे. त्यांनी हा एकदा करून बघावं असे आव्हान ठाकरे यांनी नड्डांना दिले आहे. राष्ट्रवादी कुटुंबाचा पक्ष, काँग्रेस भाऊ बहिणाचा पक्ष असून भाजपला वंशवादाच्या विरोधात लढायचं आहे. या सगळ्यामध्ये भाजपचा वंश पहिले कुठून सुरू झाला हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण तेच म्हणतात की, इतर पक्षात काम केलेले लोक आपल्याकडे येत आहेत. मग जर इतर पक्षातील लोक त्यांच्याकडे येणार असतील तर, मग भाजपचा वंश तरी नेमका कोणता हे तपासणे महत्त्वाचे आहे.
राऊतही शरण जाऊ शकत होते पण ते गेले नाहीत कारण ते एकनिष्ठ आहेत. त्याचबरोबर जे माझ्यासोबत आहेत ते दमदार आहेत आणि जे तिकडे गेले आहेत त्यांना तिकडे फक्त सत्तेचा फेस शिल्लक राहिल्यावर समजेल असं ठाकरे म्हणाले. शिवसेना संपवण्याचे प्रयत्न सध्या होत आहेत पण ते होऊ शकत नाही, देशातील राजकारण आता घृणास्पद होऊ लागलं आहे. तुम्हाला शिवसेना संपवायची असेल तर जनतेत जाऊन संपवून दाखवा असं आव्हान ठाकरेंनी दिले आहे.