धर्माच्या आधारावर निर्माण होणारे लोकसंख्येचे असंतुलन यापुढे नजरेआड करून चालणार नाही

0
398

नागपूर, दि. ५ (पीसीबी) – नागपूरच्या रेशीमबाग मैदानात आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहळा पार पडला. या सोहळ्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांचे प्रबोधन केले. देशात धर्माच्या आधारावर निर्माण होणारे लोकसंख्येचे असंतुलन यापुढे नजरेआड करून चालणार नाही, असे सरसंघचालकांनी म्हटले आहे. एखाद्या देशात लोकसंख्येचा असमतोल तयार होतो, तेव्हा त्या देशाच्या भौगोलिक सीमादेखील बदलून जातात, असा इशारा भागवत यांनी दिला आहे. देशात लोकसंख्या धोरण तयार व्हायला पाहिजे. ते सर्वांसाठी समान पद्धतीने लागू व्हावे, अशी मागणी मोहन भागवत यांनी केली आहे.

“लोकसंख्येच्या असमतोलाचा परिणाम आपण ७५ वर्षांपूर्वी पाहिला आहे. २१ व्या शतकात याच समस्येमुळे पूर्व तिमोर, दक्षिण सुदान आणि कोसोवा हे तीन स्वतंत्र देश अस्तित्वात आले. इंडोनेशिया, सुदान आणि सर्बियातील लोकसंख्येच्या असमतोलाचाच हा परिणाम आहे”, असे भागवत यांनी विजयादशमी सोहळ्यात अधोरेखित केले. जन्मदरातील विषमतेबरोबरच, लोभ, लालसा, सक्तीचे मतपरिवर्तन, घुसखोरी या मोठ्या समस्या असल्याचे भागवत यांनी म्हटले आहे.

“चीनने लोकसंख्या नियंत्रण धोरण बदलून लोकसंख्यावाढीचे धोरण स्वीकारले आहे. आपल्या देशातील लोकसंख्येचादेखील देशहिताच्या दृष्टीने विचार करता येणे शक्य आहे. आज भारत हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. ५० वर्षांनंतर आजचा युवक वर्ग ज्येष्ठ नागरिकांच्या श्रेणीत दाखल होईल, तेव्हा त्यांचा सांभाळ करण्यासाठी किती तरुणांची गरज असेल याचाही विचार आपल्याला आज करावा लागेल”, असा सल्ला भागवत यांनी दिला आहे.
आराजक निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करते …
सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले की, काहीजणांकडून भारताची प्रगती होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या घटकांकडून भारतातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम सुरू असून भेदभाव वाढवण्याचा प्रयत्न होत आहे. देशात दहशतवाद वाढावा, अराजकतेची स्थिती निर्माण व्हावी आणि लोकांना कायद्याचा आदर वाटू नये अशा पद्धतीचे प्रयत्न सुरू आहेत. असे प्रयत्न कोण करतोय हे सांगण्याची आवश्यकता नाही. सरकारकडून अशा लोकांवर कारवाई सुरू असून आपण सरकारला सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचे भागवत यांनी आपल्या भाषणात म्हटले.

मातृभाषेत शिक्षण हवे –
आपल्या शैक्षणिक धोरणात उच्च शिक्षणात मातृभाषेचा समावेश करण्यात येत आहे. त्यानुसार, आता पाठ्यक्रम पुस्तके आणि शिक्षकदेखील तयार होत आहे. पण, आपण आपल्या पाल्यांना मातृभाषेतील शिक्षणासाठी पाठवतो का, असा सवाल भागवत यांनी यावेळी केला. करिअरसाठी इंग्रजीची आवश्यकता आहे, हे एक मिथक असून जर मातृभाषेतील शिक्षणासाठी आपण आपल्या मुलांना पाठवले नाही तर सरकारचे शैक्षणिक धोरण यशस्वी होऊ शकेल का, असेही त्यांनी म्हटले.

इंग्रजांनी भारतावर आपले शैक्षणिक धोरण लादले. त्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण घेऊन अनेक महापुरुषांनी इंग्रजांविरोधात संघर्ष केला. इंग्रजांविरोधात संघर्ष करण्याचा संस्कार त्यांना शैक्षणिक धोरणातून नव्हे तर समाज आणि कुटुंबातून मिळाले होते. त्यामुळे शिक्षणासोबत कुटुंब आणि समाजाचे संस्कारदेखील आवश्यक आहेत.

सामाजिक समतेसाठी पुढाकार घ्या
मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात सामाजिक समतेचाही मुद्दा मांडला. भागवत यांनी म्हटले की, डॉ. आंबेडकर यांनी संविधानामुळे राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळतील. मात्र, सामाजिक स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करावे लागतील असे म्हटले होते. सामाजिक समानतेसाठी कायदे आहेत. मात्र, विषमता आपल्या मनात आहे. मनातील ही विषमता दूर सारण्याची आवश्यकता असून सगळ्यांनी त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे भागवत यांनी म्हटले. मंदिर, पाणवठा आणि स्मशानभूमी आदी सगळ्यांसाठी एकच असायला हवे, असे भागवत यांनी म्हटले.