धक्कादायक… पिंपरी-चिंचवडमध्ये जीवघेण्या H3N2 व्हायरसनं वृध्दाचा मृत्यू

0
381

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) : देशभरात सध्या जीवघेण्या H3N2 व्हायरसनं हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये या व्हायरसमुळं एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरु होते. एबीपी माझानं याबाबत वृत्त दिलं आहे. या मृत्यूमुळं आता राज्यात या व्हायरसमुळं मृत्यू झालेल्यांचा आकडा तीनवर पोहोचला आहे.

सध्या राज्यातच नव्हे, तर देशभरात H3N2 चा संसर्ग वाढताना दिसत आहे. मुंबई पुण्यासह राज्यातल्या काही मोठ्या शहरांमध्ये या विषाणूचे रुग्ण वाढत आहेत. मार्च महिन्यातल्या पहिल्या १५ दिवसांमध्ये मुंबईत या विषाणूचे ५३ रुग्ण आढळले आहेत. तर दोन रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. यातला एक रुग्ण अहमदनगरचा तर दुसरा नागपूर इथला आहे.

राज्यातला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच आता H3N2 विषाणूचा धोका वाढला आहे. या विषाणूमुळं आता राज्यात तिघांचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांची आज आरोग्य विभागाची बैठक बोलावली असून यामध्ये मास्कसक्ती विषयीचाही निर्णय होण्याची शक्यता आहे.