देवेगौडा यांच्या भाजपा युतीला महाराष्ट्र जनता दलाचा ठाम विरोध व निषेध

0
207

समविचारी पर्यायाबाबत लवकरच निर्णय घेणार – जनता दल सेक्युलर महाराष्ट्र

मुंबई,दि.०१(पीसीबी) – “महाराष्ट्र जनता दलाने सातत्याने धर्माधिष्ठित राजकारणाच्या विरोधात ठाम भूमिका घेतली होती व आहे. त्यामुळे देवेगौडा यांच्या भाजपाशी युतीच्या निर्णयाचा ठाम विरोध व निषेध महाराष्ट्र जनता दलाने केला आहे. महाराष्ट्र जनता दल अशा कोणत्याही युतीत वा निर्णयात कोणत्याही परिस्थितीत कदापिही सहभागी होणार नाही अशी स्पष्ट व ठाम भूमिका जाहीर करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर या युतीच्या विरोधी भूमिकेतून जनता दलाच्या विविध राज्य संघटनांनी सामूहिक विचार प्रक्रिया सुरु केलेली आहे. त्यामध्येही महाराष्ट्र जनता दल सहभागी होईल व सक्रिय राहील असा निर्णय जनता दल महाराष्ट्र पक्ष कार्यकारिणी व जिल्हाध्यक्ष बैठकीत एकमताने घेण्यात आला आहे.

देवेगौडा यांनी जाहीर केलेल्या युतीचे गंभीर परिणाम सर्व राज्यांतील धर्मनिरपेक्ष जनता दल संघटना, कार्यकर्ते व मतदारांवर होणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश जनता दल पक्ष संघटनेला राष्ट्रीय पक्ष नेत्यांशी व पक्षाशी संबंध तोडणे अपरिहार्य झालेले आहे. राज्यातील सर्व पक्ष कार्यकर्त्यांची पुढील वाटचाल एकत्रित व एकसंध व्हावी यासाठी अन्य समविचारी पक्षांपैकी योग्य पर्याय निश्चित करण्यासाठी समान विचारसरणी असलेले राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष व अन्य पर्यायासंदर्भात संबंधित पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष व नेते यांच्याशी समक्ष चर्चा करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे. यासाठी एक समिती नियुक्त करण्यात आली असून ही समिती मा. बी. जी. कोळसे पाटील यांच्या संमतीने व सहकार्याने आवश्यक त्या सर्व पक्षनेत्यांशी व संबंधितांशी चर्चा करुन जो निर्णय घेईल, त्यामध्ये सहभागी होण्याचा व पुढील वाटचाल करण्याचा निर्णयही जनता दलाच्या या सभेत एकमताने घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे जनता दलातील सर्व राज्य पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, राज्य कार्यकारीणी सदस्य व निमंत्रित यांची राज्यस्तरीय व्यापक बैठक पुणे येथे शनिवार दि. ३० सप्टेंबर रोजी बॅ. नाथ पै सभागृह, राष्ट्र सेवा दल मध्यवर्ती कार्यालय, साने गुरुजी स्मारक, पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये वरील निर्णय एकमताने घेण्यात आले आहेत.

जनता दलाचे माजी आमदार गंगाधर पटणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस राज्यातील २० जिल्ह्यातील ८० निमंत्रित सदस्य उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीस डॉ. स्वामिनाथन यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या बैठकीमध्ये श्रीमती साजिदा निहाल अहमद, प्रताप होगाडे, डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, शिवाजी परुळेकर, ॲड. रेवण भोसले, डॉ. विलास सुरकर, सलीम भाटी, ॲड. नंदेश अंबाडकर, युयुत्सु आर्ते, विठ्ठल सातव, दत्तात्रय पाकिरे, विद्याधर ठाकूर, प्रभाकर नारकर, श्रीमती शानेहिंद निहाल अहमद, श्रीमती साधना शिंदे, कर्नल चंद्रशेखर रानडे, नाना मानकर, जितेंद्र सतपाळकर, शरद पाडळकर, जीवन श्रीसुंदर, विनायक लांबे, अशोक गायकवाड इ. प्रमुखांनी चर्चेत भाग घेतला व आपले विचार मांडले. स्वागत विठ्ठल सातव यांनी व सूत्र संचालन डॉ. पी. डी. जोशी यांनी केले.