दिघीतील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा, अन्यथा हंडा मोर्चा काढणार; माजी नगरसेवक विकास डोळस यांचा इशारा

0
236

दिघी, दि. १८ (पीसीबी) – दिघीगाव व उपनगरांमध्ये पाणी समस्या गंभीर होत आहे. गेली दोन महिने अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. याबाबत तात्काळ उपाययोजना करून पाणीपुरवठा पुरेशा दाबाने करावा. अन्यथा प्रथम’ ई’ प्रभाग समितीवर व त्यानंतर महापालिका मुख्यालयावर धडक हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा माजी सभापती, माजी नगरसेवक विकास डोळस यांनी प्रशासनाला दिला आहे.

याबाबत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांना निवेदन दिले आहे. माजी नगरसेवक कुंदन गायकवाड उपस्थित होते. निवेदनात माजी नगरसेवक डोळस यांनी म्हटले आहे की, गेली महिनाभर दिघी व उपनगरांमध्ये पाणी समस्या गंभीर होत आहे. एकतर दिवसाआड पाणीपुरवठा त्यात अपुरा व कमी दाबाने. चार दिवसांवर दिवाळी आली आहे. अपुऱ्या दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक खासकरून माताभगिनी त्रस्त झाल्या आहेत. दररोज पाणी तक्रारी संदर्भात अनेक नागरिकांचे फोन येत आहेत.

नागरिक अतिशय त्रस्त झाले असून त्यांच्यात असंतोष निर्माण होत आहे. पाणी ही दैनंदिन जीवनातील मुलभूत गरज आहे. मागील वर्षापासून पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. दिवसाआड ही पुरेसा पाणीपुरवठा होत नसेल तर नागरिकांनी करायचे काय ? वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून तातडीने उपाययोजना कराव्यात. अन्यथा नागरिकांच्या रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागेल. आमच्या समस्येचे निराकरण झाले नाही. तर प्रथम’ ई’ प्रभागावर व नंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेवर धडक हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा माजी नगरसेवक डोळस यांनी दिला आहे.