दसरा मोळाव्याला तेजस ठाकरेंचे लॉंचिंग होणार

0
290

– आदित्य ठाकरेंच्या मदतीला आता जहाल विचारांचा भाऊ

मुंबई, दि. २१ (पीसीबी) : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे घराण्यातील धाकटी पाती असणारे तेजस ठाकरे हे राजकारणात सक्रिय होणार असल्याच्या चर्चा सातत्याने सुरु आहेत. तेजस ठाकरे अधुनमधून शिवसेनेच्या व्यासपीठांवर दिसून येतात. आदित्य ठाकरे यांच्याप्रमाणे तेजस यांनी अद्याप पूर्णवेळ राजकारणाला वाहून घेतलेले नाही. मात्र, आता शिवसेना कधी नव्हे इतक्या मोठ्या संकटात सापडल्याने तेजस ठाकरे हे राजकीय रणांगणात उतरणार असल्याचे सांगितले जात आहे. दसरा मेळाव्याला तेजस ठाकरे यांचे राजकीय लाँचिंग होण्याची शक्यता आहे. कारण, दसरा मेळाव्यापूर्वी मुंबईत झळकत असलेल्या शिवसेनेच्या बॅनसर्वर तेजस ठाकरे यांचे छायाचित्र झळकत आहे. दहा वर्षांपूर्वी आदित्य ठाकरे यांचे लॉन्चिंग करताना स्वतः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आदित्यपक्षा तेजस खूप जहाल असल्याचा जाहीर उल्लेख केला होता म्हणून आता शिवसैनिकांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या आहेत.

या पोस्टरमध्ये उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह तेजस ठाकरे यांचाही फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याला तेजस ठाकरे हे सक्रिय आणि पूर्णवेळ राजकारणात प्रवेश करतील, असे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी दहीहंडी उत्सवावेळीही शिवसेनेच्या बॅनर्सवर तेजस ठाकरे यांची छबी दिसून आली होती. यामध्ये बाळासाहेब यांचा उल्लेख ‘हिंदुहदयसम्राट’, उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘कुटुंबप्रमुख’ तर आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांचा उल्लेख अनुक्रमे ‘युवानेतृत्त्व’ आणि ‘युवाशक्ती’ म्हणून करण्यात आला होता.

आदित्य ठाकरे यांनी गेल्या काही वर्षांमध्ये राजकारणात आपले बस्तान बऱ्यापैकी बसवले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची कामगिरी समाधानकारक होती. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील अनेक जुणेजाणते नेते निघून गेल्यामुळे भविष्यात आदित्य ठाकरे यांना शिवसेनेत आणखी मोठी जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागणार आहे. अशा परिस्थितीत आदित्य ठाकरे यांचा राजकारणातील लाँचिंग पॅड ठरलेल्या युवासेनेचे नेतृत्त्व तेजस ठाकरे यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. ठाकरे घराण्याचे वलय असल्यामुळे तेजस ठाकरे तरुण मतदारांना आकर्षित करू शकतात, असा कयास आहे. त्यामुळे आता दसरा मेळाव्यात तेजस ठाकरे यांचे राजकीय लाँचिंग होणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

आज शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा –
गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेना आणि शिंदे गटातील द्वंद्व उत्तरोत्तर तीव्र होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत बुधवारी शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा होत आहे. गोरेगावच्या नेस्को मैदानावर होणाऱ्या या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानात आज संध्याकाळी सात वाजता हा मेळावा होणार आहे. शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच शिवसैनिकांना जाहीर मार्गदर्शन करणार आहेत.