थर्ड आय – अविनाश चिलेकर | अमित गोरखेंची उमेदवारी कशासाठी ?

0
530

गावगाड्यात अत्यंत उपेक्षित अशा मातंग समाजातील सामान्य कार्यकर्ता म्हणून अमित गोरखे यांना भाजपने विधान परिषदेची उमेदवारी दिली. परिषदेच्या १२ जागांसाठी निवडणूक होत आहे. भाजपला आमदारांच्या संख्याबळानुसार पाच जागा मिळणार आहेत. पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, सदाभाऊ खोत, परिणय फुके या रथीमहारथींच्या बरोबर अमित गोरखे यांची नावे भाजपने जाहीर केली. मुळात ही नावे निश्चित करताना जातीय समिकरणाला महत्व देण्यात आले, हे लक्षात घेतले पाहिजे. लोकसभा निवडणुकित भाजपचे महाराष्ट्रात पानीपत झाले आणि अवघ्या नऊ जागा मिळाल्या. मुळात भाजपचा आधार असलेला इतर मागास म्हणजे ओबीसी समाज तसेच आरक्षण आणि संविधानाच्या मुद्यावर मागास समाज काँग्रेस, शिवसेनेकडे सरकला हे निकालात लक्षात आले. आता या घटकांचा जनाधार पुन्हा मिळविण्याचा भाजपचा खटाटोप आहे. वंजारी म्हणून पंकजा मुंडेंना टार्गेट करून पाडण्यात आले, आता त्यावर मलमपट्टी म्हणून पंकजा तसेच परिणय फुके यांना संधी देण्यात आली. मराठा आरक्षणात सगेसोयरेच्या मुद्यामुळे ओबीसीच्या आरक्षणावरच गदा येणार हे लक्षात आल्याने नाराज माळी समाजाचे प्रतिनिधी म्हणून पक्षाच्या युवा मोर्चाचे नेते माजी आमदार योगेश टिळेकर यांना संधी मिळाली. शेतकरी नेते म्हणून सदाभाऊ खोत यांना उमेदवारी मिळाली आहे.

सर्व बड्या नेत्यांत गोरखे यांना संधी कशी मिळाली यावर अधिक खल सुरू आहे. पिंपरी चिंचवड शहरातील भाजपसह अन्य राजकीय नेत्यांना हा प्रश्न पडलाय. शहरात चिंचवडमधून आश्विनी जगताप आणि भोसरीचे महेश लांडगे हे दोन भाजपचे आमदार आहेत. निष्ठावंतांपैकी महिला प्रदेशाध्यक्ष आणि ओबीसी मधील सोनार समाजाच्या म्हणून दोन वर्षांपूर्वी उमा खापरे या भाजपातून आमदार झाल्या. पिंपरी चिंचवड शहराला पाचवा आणि भाजपला चौथा आमदार मिळणार आहे. आगामी विधानसभा तसेच महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जात हा सर्वात महत्वाचा निकष ठरल्याने गोरखेंना संधी मिळाली. तसे पाहिले तर शहरात सचिन पटवर्धन, सदाशिव खाडे, मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, अनुप मोरे, अमोल थोरात, रवि लांडगे यांच्यासह अनेकांनी भाजपसाठी आयुष्य वेचले. आठ-दहा नगरसेवक निवडूण आणू शकतील असे किमान दहा-वीस माजी नगरसेवक भाजपकडे आहेत. भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप आमदार होण्यासाठी गुढघ्याला बाशिंग बांधून आहेत. आमदारकीसाठी माजी पक्षनेते एकनाथ पवार हे शहर आणि भाजप सोडून कंधार-नांदेड तालुक्यात शिवसेनेकडून तयारी करत आहेत. मागास समाजात चळवळीतील कार्यकर्त्या तसेच रामदास आठवले यांच्या समर्थकांपैकी चंद्रकांता सोनकांबळे दोनदा आमदारकीला पराभूत झाल्या. अशा सर्वांतून केवळ गोरखे यांनाच संधी मिळाली, कारण भाजपला आता पुन्हा सोशल इंजिनिअरींग महत्वाचे वाटते.
लहान वयातील कर्तृत्व, नेतृत्व –

अमित गोरखे यांचे अगदी लहान वयातील कर्तृत्व हासुध्दा एक महत्वाचा गूण म्हणावा लागेल. काळभोरनगर येथील राष्ट्रतेज गणेश तरूण मंडळाचा कार्यकर्ता, दिवंगत शिवसेना खासदार गजानन बाबर आणि त्यांचे बंधू मधुकर बाबर यांच्या तालमित तयार झालेला कार्यकर्ता अशी गोरखे यांची मूळची ओळख. राजकारण बाजुला ठेवून नॉव्हेल इन्स्टिट्यूट ही शैक्षणिक संस्था स्थापन करून ती नावारुपाला आणली. असा कार्यकर्ता आपल्याकडे पाहिजे म्हणून तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोरखे यांना मातंग समाजोध्दारासाठी राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले ६०० कोटींचे अण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्षपद बहाल केले. कोणालाही न दुखावता भाजपच्या कोअर ग्रुपमध्ये गोरखे यांनी प्रवेश केला. खरे तर ते पिंपरी राखीव मतदारसंघातून तयारी करत होते, पण मतांच्या जातीय गणितात ते निवडून येणे अशक्य असल्याचे स्वतः फडणवीस यांना ताडले आणि त्यांना सरळ विधान परिषदेवर संधी दिली. अत्यंत विश्वासातले म्हणजे फडणवीस यांचे नाक,कान आणि डोळे म्हणून गोऱखे आहेत, हेसुध्दा एक कारण ठरले. कोळभोरनगर परिसरात एकेकाळी सायकलवर पेरू विकणारे, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना अमित गोरखे आता आमदार होतील. गेली दहा- बारा वर्षे भाजपशी एकनिष्ठ राहिल्याचे हे फळ आहे.
महेश लांडगेंना अलिखीत इशारा –

अमित गोरखे यांच्या उमेदवारीने आणखी एक संदेश दिला. भोसरी मतदारसंघात सत्ता आणि पैशाच्या जोरावर भाजपचे नाव वापरून राजकारण करणाऱ्या आमदार महेश लांडगे यांनाही हा अप्रत्यक्ष इशारा आहे. भाजपमधील दुहेरी निष्ठा असणाऱ्या अनेक पदाधिकाऱ्यांनाही हा एक संदेश आहे. गोरखे किंवा उमा खापरे हे अशा अत्यंत दुबळ्या समाज घटकातून आलेत की, ज्यांच्या लेखी राजकारण किंवा असली आमदारकी, पद, प्रतिष्ठा हे शब्दसुध्दा गावी नाहीत. निवडणुकिच्या राजकारणासाठी लागणारा पैसा, मनुष्यबळ, कार्यकर्त्यांची फौज असे दहा टक्कासुध्दा त्यांच्याकडे नाही. महापालिकेला दहा नगरसेवक निवडूण आणायचे तर ते सुध्दा त्यांच्या आवाक्यातले नाही. गावकी भावकी पाठिशी नाही, उलट तिथे उपेक्षाच होते. गुंडापुंडांची ताकद म्हणाल तर त्याचा काडिचाही संबंध नाही. अशाही परिस्थितीत भाजपने गोरखेंना आमदार केले कारण स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही आमच्या मातीत आणि मनामनात रुतून बसलेली जात. मग ती पुरोगामी विचारांची कास धरून चालणारी काँग्रेस, राष्ट्रवादी असो वा, वेद हेच प्रमाण समजणारी सनातनवादी भाजप असो. अमित गोरखेंना शुभेच्छा !