तोतया पोलिसाने गांजाची चेकिंग चालू असल्याचे सांगत मजुराला गंडवले

0
247

चाकण, दि. २८ (पीसीबी) – तोतया पोलिसाने दुचाकीवरून जाणाऱ्या एका मजुराला अडवले. गांजाची चेकिंग चालू असल्याचे सांगत मजुराच्या गळ्यातील एक लाख 82 हजारांची सोन्याची साखळी काढून घेत गंडा घातला. हा प्रकार शनिवारी (दि. 27) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर चाकण येथे घडला.

अण्णा नाना पवार (वय 52, रा. नेरेदत्तवाडी, हिंजवडी) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी तोतया पोलिसाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवार हे शनिवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावरून त्यांच्या दुचाकीवरून जात होते. चाकण येथे आल्यानंतर एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या एकाने तो पोलीस असल्याची फिर्यादी यांना बतावणी केली. गाडी बाजूला घेण्यास सांगून गांजाची चेकिंग सुरु असल्याचे सांगत फिर्यादी यांच्या खिशातील पैसे, मोबाईल फोन आणि डायरी गाडीच्या डिक्कीत ठेवले. त्यानंतर फिर्यादी यांच्या गळ्यातील एक लाख 82 हजार 223 रुपये किमतीची 36.50 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी काढली. ती गाडीच्या डिक्कीत ठेवण्याचा बहाणा करून ती डिक्कीत न ठेवता स्वतःकडे ठेऊन घेत फिर्यादी यांची फसवणूक केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.