‘ते’ गोळ्या घालणार आणि हिंदूंनी केवळ बघत बसायचे का?

0
365

डोंबिवली, दि. ३ (पीसीबी) – काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांची हत्या सुरू आहे. ‘ते’ गोळ्या घालणार आणि हिंदूंनी केवळ बघत बसायचे का? हिंदूंना स्वसंरक्षणाचा अधिकार नाही का? असे प्रश्न मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केले. मारणाऱ्यांकडे विनापरवान्याचे शस्त्र असतील तर आम्हाला बंदुका आणि परवाने द्या. प्रत्येकाला संरक्षण देणे केंद्र सरकारला शक्य नसेल तर बंदुका तरी द्या, अशी अजब मागणी देशपांडे यांनी केंद्र सरकारकडे केली. मनसेच्या कामगार संघटनेने कल्याणमध्ये शुक्रवारी (ता.३) आंदोलन केले. प्रशासनाची भेट घेण्यासाठी मनसे नेते संदीप देशपांडे व संतोष धुरी कल्याणमध्ये आले होते. या वेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

केंद्र सरकारबरोबर राज्यातील आघाडी सरकारमधील नेत्यांवरही त्यांनी टीका केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना कोरोना झाल्यावर टीका केली होती. मास्क वापरत नाही, आता दुसऱ्यांदा कोरोना झाला. ऑपरेशनदेखील रखडले, असे पवार म्हणाले होते. यावर देशपांडे म्हणाले, उपमुख्यमंत्री मास्क घालून फिरतात, त्यांनाही कोरोना झाला. राज ठाकरे यांना कोरोना झालेला नाही, त्यांच्यामध्ये कोरोनाचे डेड सेल्स आढळले आहेत, ही गोष्ट त्यांनी लक्षात घेतली पाहिजे. अर्धवट माहितीच्या आधारे उपमुख्यमंत्र्यांनी तरी बोलू नये.